Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचा मृतदेह दोन दिवसानंतर काढला बाहेर
ऐक्य समूह
Friday, November 10, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: re3
महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न यशस्वी
5सातारा, दि. 9 :  वाई तालुक्यातील चिखली गावातील शेतकर्‍याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दोन दिवसापासून मृतदेह बाहेर न आल्याने महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह बाहेर काढला.
 या घटनेची अधिक माहिती अशी, वाई तालुक्यातील चिखली गावातील गणेश रामचंद्र वाघ (वय 49) हे आणि त्यांची पत्नी असे दोघेच गावात रहातात. त्यांची दोन्ही मुले हे नोकरी निमित्त बाहेर असतात. त्यांचा थोरला मुलगा हा सैन्यदलात आहे तर मुलगी सीमा सुरक्षा दलात नोकरीला आहे. दि. 7 नोव्हेंबर रोजी गणेश वाघ हे नेहमीप्रमाणे बैलांना बांधलेल्या गोठ्यात झोपले होते. पहाटे चार वाजता त्यांचे साडू हे घरातून बाहेर आले तेव्हा त्यांना गोठ्याचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या पत्नीला दिली. गणेश यांचा सर्वत्र शोध सुरू झाला तरी ते सापडले नाहीत. मात्र त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या एका विहिरीत त्यांच्या गोठ्यातील कासरा पडल्याचे त्यांच्या घरातील लोकांना दिसले, त्यावरून ते विहिरीत असल्याचा आंदाज लाऊन त्या बाबतची माहिती पोलिसांना दिली. 
पोलिसांनी महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी सकाळी पाचारण केल्यानंतर त्यांनी फिश डिटेक्टरच्या साह्याने विहिरीत पाहिले असता मृतदेह विहिरीतच असल्याचे निदर्शनास आले. महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी अकरच्या साह्याने 80 फुटावर कपारीत अडकलेला गणेश यांचा मृतदेह बाहेर काढला.
हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे कार्यकर्ते सुनीलबाबा भाटिया,अनिल केळगणे, नीलेश बावळेकर, सनी बावळेकर, बाबू वाघदरे, रोहित गोळे, शुभम बावळेकर, सुीनल वाडकर, विशाल बेलोशे यांनी प्रयत्न केले.
गणेश यांनी आत्महत्या करण्याच नेमके कारण समजू शकले नाही. मात्र त्यांनी आत्महत्या करताना स्वत:ला दगड बांधून विहिरीत उडी मारल्याचा पोलिसांचा प्राथमिक आंदाज आहे.
आत्महत्येची वेळ रात्री 1 वाजून 5 मिनिटे
गणेश यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांच्या हातात घड्याळ होते. जेव्हा त्यांना बाहेर काढले तेव्हा त्यांच्या हातातील घड्याळ हे 1 वाजून 10 मिनिटाने बंद पडलेले होते. त्यांचे घड्याळ पाण्यात गेल्यामुळे बंद पडले. मात्र त्या वेळेवरून पोलिसांनी आंदाज वर्तवला आहे, की त्यांनी रात्री एक वाजून पाच मिनिटांनी विहिरीत उडी मारली असावी.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: