Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शाळेतील शिपायाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
ऐक्य समूह
Friday, November 10, 2017 AT 11:14 AM (IST)
Tags: re4
वर्गखोलीच्या भिंतीवर पाणी मारताना दुर्घटना
5म्हसवड/पळशी, दि. 9 : पिंपरी, ता. माण येथील श्री हनुमान माध्यमिक विद्यालयातील शिपाई बाळू दाजी तरंगे (वय 50) यांचा गुरुवारी सकाळी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तरंगे हे विद्यालयाच्या रंगकाम केलेल्या भिंतीवर विद्युत मोटारीच्या साह्याने पाणी मारत असताना ही दुर्घटना घडली. तरंगे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेच्या संस्थापकांवर सदोष मुनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पिंपरी ग्रामस्थांनी केली आहे.
सातारा-पंढरपूर हमरस्त्यालगत पिंपरी, ता. माण येथे हनुमान माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयाला बाळू तरंगे यांनी स्वत:च्या मालकीची जागा दिली होती. शाळा स्थापनेपासून बाळू तरंगे हे शिक्षक म्हणून तर अवघडे नावाचे लेखनिक कार्यत होते. मात्र, दहा वर्षांपूर्वी आकृतिबंधाच्या जाचक अटीचा फटका बसून तरंगे हे तेव्हापासून शिपाई म्हणून काम करत होते. विद्यालयाच्या नवीन दोन खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तेथे रंगकाम करण्यात आले आहे. रंगकाम केलेल्या भिंतीवर तरंगे हे ते आज सकाळी विद्युत मोटर लावून पाइपच्या सहाय्याने पाणी मारत होते. त्याच वेळी त्यांचा पाया वायर जोडलेल्या ठिकाणी पडून त्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसला. त्यांच्यावर तातडीने जवळच्या खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच शेकडो नागरिकांनी आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. ज्या ठेकेदाराने शाळा खोल्यांच्या बांधकामाचा ठेका घेतला होता, त्यानेच रंगकाम करून खोल्या पूर्ण करून देणे बंधनकारक असतानाही बाळू तरंगे हे काम करत होते. शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे संस्थापक व संबंधित ठेकेदार यांना बाळू तरंगे यांच्या मृत्यूस जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली. बाळू तरंगे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार असून एका मुलास वारसाहक्काने नोकरी द्यावी, अशी मागणी माण पंचायत समितीचे उपसभापती पै. नितीन राजगे व डॉ. दिलीप राजगे यांच्याकडे नागरिकांनी केली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत ग्रामस्थ म्हसवड पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडून बसले होते. या प्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी आक्रमक भूमिका नातेवाईक व नागरिकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी येऊन पाहणी केली. या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन पोलिसांनी दिल्यानंतर ग्रामस्थ व नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेची फिर्याद दादा हिराप्पा राजगे यांनी दिली असून हवालदार देशमाने तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: