Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हिमाचल प्रदेशमध्ये 74 टक्के विक्रमी मतदान
vasudeo kulkarni
Friday, November 10, 2017 AT 11:17 AM (IST)
Tags: na1
18 डिसेंबरला मतमोजणी; भाजपचा विजयाचा दावा
मतदान केल्याची खूण दाखवताना देशातील सर्वात पहिले आणि सर्वात वृद्ध मतदार श्यामशरण नेगी.
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत गुरुवारी सरासरी 74 टक्के एवढे विक्रमी मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. हिमाचल प्रदेशातील 68 जागांसाठी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान झाले असून मतदान यंत्रांमधील बिघाड व अन्य कारणांमुळे 500 मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान झाले. त्यामुळे सरासरी मतदानात किंचित वाढ होण्याची शक्यता असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले.
यापूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये 2012 च्या विधानसभा निवडणुकीत 73.5 टक्के मतदानझाले होते. राज्यात हे सर्वाधिक मतदान होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का थोडा वाढला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात केवळ 64.45 टक्के मतदान झाले होते, असे निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी सांगितले.
या निवडणुकीत 68 मतदारसंघांमधील सर्व मतदान केंद्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबरोबर 11 हजार 283 ‘व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल’ (व्हीव्हीपॅट) यंत्रांचाही वापर करण्यात आला. त्यातील 297 यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने तेथील मतदान यंत्रे बदलण्यात आली. मतदान प्रक्रिया शांततेत झाल्याचे सक्सेना यांनी सांगितले.  
या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात जोरदार लढत आहे. राज्यात 62 आमदारांसह एकूण 337 उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री वीरभद्र सिंह, दहा मंत्री, आठ मुख्य संसदीय सचिव, विधानसभेचे उपाध्यक्ष जगतसिंह नेगी, माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल आणि डझनभर माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह आणि भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार धुमल यांच्यात संघर्ष आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 18 डिसेंबरला मतमोजणी होईल. 7 हजार 521 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया झाली. विशेष म्हणजे स्वतंत्र भारतातील निवडणुकीत पहिले मतदार असलेले 100 वर्षांचे श्यामशरण नेगी हे या निवडणुकीतील सर्वात वयोवृद्ध मतदार ठरले आहेत. नेगी यांनी कल्पा येथे मतदान केले. त्यांच्या स्वागतासाठी निवडणूक आयोगाने लाल गालिचा अंथरला होता. प्रत्येक नागरिकाने देशहितासाठी मतदानाचे कर्तव्य बजावलेच पाहिजे, असे आवाहन नेगी यांनी केले.
ही निवडणूक सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. मावळत्या विधानसभेत काँग्रेसचे 35 तर भाजपचे 28 आमदार आहेत. या निवडणुकीत सत्ता अबाधित राखण्याचा दावा काँग्रेसने केला आहे तर राज्यात सत्तांतर होईल, असा विश्‍वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीत राज्यातील जनतेने आपला कौल दिला आहे. भाजप प्रचंड बहुमताने विजयी होईल. काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली असून आम्हाला 60 जागांवर विजय मिळेल. निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस राज्यातून गायब झालेली दिसेल, असा विश्‍वास भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख अनिल बलुनी यांनी व्यक्त केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: