Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपला 113-121 जागा मिळण्याची शक्यता
ऐक्य समूह
Friday, November 10, 2017 AT 11:07 AM (IST)
Tags: mn3
गुजरातमध्ये निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचा अंदाज
5मुंबई, दि. 9 (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या जनमत चाचणीचे (ओपिनियन पोल) निकाल गुरुवारी समोर आले असून गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे दिसून आले. गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. एबीपी-लोकनीती-सीएसडीएस यांनी केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांपैकी 113 ते 121 जागा भाजपला मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसला 58 ते 64 जागांवर विजय मिळेल तर 1 ते 7 जागांवर अपक्षांची सरशी होण्याची शक्यता आहे.
गुजरात निवडणुकीत भाजपला 47 टक्के तर काँग्रेसला 41 टक्के मते पडतील, असा या चाचणीचा अंदाज आहे. 2012 साली झालेल्या निवडणुकीत भाजपला 48 टक्के तर काँग्रेसला 39 टक्के मते मिळाली होती. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 60 टक्के आणि काँग्रेसला 33 टक्के मते मिळाली होती.
यावेळी गुजरातमध्ये सत्तापालट होईल, असा विरोधकांचा दावा आहे; परंतु या निवडणुकीत भाजप सत्ता कायम राखणार असल्याचा जनमत चाचणीचा अंदाज आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांचीटक्केवारी वाढण्याची 
शक्यता आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत 15 टक्के घसरण झाल्याची शक्यता चाचणीत वर्तविण्यात आली आहे.
दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये भाजपला आघाडी मिळेल तर सौराष्ट्र-कच्छ आणि उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसची सरशी होईल. आदिवासी बहुल दक्षिण गुजरातमध्ये 35 जागांवर भाजपला 51 टक्के तर काँग्रेसला 33 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी 1 डिसेंबर 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीत भाजपला या भागात 54 टक्के तर काँग्रेसला 27 टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या निवडणुकीत राज्यातील 50 टक्के महिलांचा भाजपला तर 39 टक्के महिलांचा काँग्रेसला पाठिंबा मिळेल. मध्य गुजरातमधील 40 जागांवर भाजपला 54 टक्के तर काँग्रेसला 38 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे 1 डिसेंबर 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीच्या तुलनेत भाजपचे दोन टक्क्यांचे नुकसान तर काँग्रेसच्या मतांमध्ये 8 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तर गुजरातमधील 53 मतदारसंघांमध्ये भाजपला 44 टक्के तर काँग्रेसला 49 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 1 डिसेंबर 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीच्या निकालांच्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये 15 टक्क्यांची घट तर काँग्रेसच्या मतामध्ये 16 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सौराष्ट्र-कच्छमधील 54 जागांवर भाजपला 44 टक्के तर काँग्रेसला 42 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, अशी काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे या जनमत चाचणीत नोंदविण्यात आली आहेत. 1 डिसेंबर 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीच्या निकालात सौराष्ट्र-कच्छ या भागात भाजपला 65 तर काँग्रेसला 26 टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: