Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजी विक्रेत्यांवर कारवाई करणार्‍या सातारा
ऐक्य समूह
Friday, November 10, 2017 AT 11:16 AM (IST)
Tags: lo4
पालिका कर्मचार्‍याला शिवीगाळ, धक्काबुक्की
5सातारा,  9 : गणपतराव तपासे मार्गावर  भाजी विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या सातारा नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत एका विक्रेत्याने धक्काबुक्की केली. त्यानंतरही कर्मचार्‍यांनी तेथील साहित्य जप्त केले. मात्र काही काळानंतर विक्रेत्यांनी पदाधिकार्‍यांशी संपर्क साधला आणि त्यानंतर त्यांनी जप्त केलेले साहित्य परत करायला लावले. आम्ही कारवाई केली की काही वेळातच कारवाई मागे घ्यावी लागते. त्यामुळेच कारवाई करण्याच्या फंदात आम्ही पडत नाही, अशी प्रतिक्रिया एका कर्मचार्‍याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
नगराध्यक्षा सौ. माधवी कदम गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास बसस्थानकाकडून गणपतराव तपासे मार्गावर आल्या. त्यावेळी या रस्त्यावर  40 फळ व भाजी विक्रेते बसल्याचे त्यांना दिसले. विक्रेत्यांमुळे तेथे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे त्यांनी  अतिक्रमणविरोधी विभागाच्या कर्मचार्‍यांना वाहतुकीस अडथळा करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रशांत निकम व त्यांचे सहकारी पालिकेचे वाहन घेऊन तेथे गेलेे. सकाळी 10 वाजेपर्यंतच रस्त्यावर भाजी विक्रीस परवानगी असताना दुपार झाली तरी तुम्ही येथे कसे बसलात. मंडईत जाऊन का बसला नाहीत, असे प्रश्‍न त्यांनी विक्रेत्यांना केले. तुम्ही नियम पाळले नाहीत, असे सांगत त्यांनी  विक्रेत्यांचे साहित्य जप्त करून पालिकेच्या वाहनात ठेवले. यावेळी एका विक्रेत्याने निकम व पालिकेच्या एका कर्मचार्‍याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.  
पालिका कर्मचार्‍यांनी तरीही कारवाई सुरू ठेवत विक्रेत्यांचे साहित्य ताब्यात घेऊन पालिकेत जमा केले. कारवाईनंतर विक्रेत्यांनी पदाधिकार्‍यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर पदाधिकार्‍यांनी ताब्यात घेतलेले साहित्य विक्रेत्यांना परत करण्याचे आदेश कर्मचार्‍यांना दिले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: