Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिपाई मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक व शाळा संस्थापकांवर गुन्हा दाखल
ऐक्य समूह
Saturday, November 11, 2017 AT 11:40 AM (IST)
Tags: re2
5पळशी, दि. 10 : विद्यालयाने बांधलेल्या वर्ग खोल्यांना रंग देण्यासाठी भिंतीवर पाणी मारताना शाळेचे शिपाई बाळू दाजी तरंगे यांना शॉक लागल्याने त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस विद्यालयाचे मुख्याध्यापक व संबंधित संस्थाप्रमुखांनाच जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी तरंगे यांच्या नातेवाइकांनी करत या दोघांवर जोवर गुन्हा दाखल होत नाही तोवर मृतदेह न उचलण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पवार व संस्थापक डॉ. महादेव कापसे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी, पिंपरी, ता. माण येथे हनुमान विद्यालय आहे. या विद्यालयाचे संस्थापक डॉ. कापसे तर मुख्याध्यापक म्हणून अरुण पवार हे काम पाहतात. याच शाळेत मयत बाळू दाजी तरंगे (वय 42) हे शिपाई पदावर काम करीत होते. विद्यालयाने काही वर्ग खोल्याना रंगरंगोटी देण्याचे काम एका ठेकेदाराला दिले आहे. रंग देण्यापूर्वीत्या खोल्यांवर पाणी मारण्याची गरज असल्याचे  संबंधित ठेकेदाराने मुख्याध्यापकांना सांगितल्याने या वर्ग खोल्यांवर पाणी मारण्यासाठी मुख्याध्यापकांनी शिपाई तरंगे यांना सांगितले. त्यानुसार तरंगे हे संबंधित वर्ग खोल्यांवर इलेक्ट्रिक मोटरीने पाणी मारत असताना त्या मोटरीचा जबरदस्त शॉक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही खबर पिंपरी ग्रामस्थ व तरंगे यांच्या नातेवाइकांना समजल्यावर त्यांनी तत्काळ म्हसवड पोलीस स्टेशनला याबाबतची खबर दिली. त्यानंतर म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी पिंपरी ग्रामस्थ व तरंगे यांच्या नातेवाइकांनी तरंगे यांच्या मृत्यूस विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्थाप्रमुख हेच जबाबदार असल्याचा आरोप करत तरंगे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने वातावरण गंभीर बनले होते. ग्रामस्थ व नातेवाईक आक्रमक झाल्याने माणचे उपसभापती पै. नितीन राजगे व डॉ. दिलीप राजगे यांनी म्हसवड पोलीस स्टेशनला भेट देत नातेवाईक व ग्रामस्थांच्या मागणीनुसार पोलिसांनी पिंपरीतील हनुमान विद्यालय येथे जावून प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कारवाई करण्याची विनंती केली. त्यानुसार म्हसवड पोलिसांनी त्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता संबंधित विद्यालयातील विद्युत मोटरीला लावण्यात आलेल्या वायरला प्लग व पिन नसल्याचे दिसून आले. तसेच या मोटरीला असलेली वायरही जागोजाग तुटलेली असल्याचे निदर्शनास आले. परिसरात विद्युत प्रवाह वाहणार्‍या मोठ्या वायरचा बंडलही अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला.  याची माहिती असूनही मुख्याध्यापक पवार यांनी बेजबाबदारपणे शिपाई तरंगे यांना पाणी मारण्यासाठी सांगितले. त्यामुळेच तरंगे यांच्या मृत्यूस विद्यालयाचे मुख्याध्यापक हे जबाबदार आहेत तर संबंधित खराब असलेली वायर बदलावी, असे ग्रामस्थांनी वारंवार सांगून देखील विद्यालयाचे संस्थापक डॉ. महादेव कापसे यांनी लक्ष दिले नाही. एवढी मोठी दुर्घटना घडूनही अद्यापपर्यंत या कुटुंबीयांची साधी चौकशी केली नसल्याने ते सुद्धा तरंगे यांच्या मृत्यूस जबाबदार आहेत. याबाबतची फिर्याद मयत तरंगे यांचा भाचा तायाप्पा साहेबराव राजगे यांनी दिल्याने पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 30 ए नुसार संबंधित मुख्याध्यापक व संस्था प्रमुखांवर गुन्हा दाखल केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: