Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘जीएसटी’ परिषदेचा करदिलासा
ऐक्य समूह
Saturday, November 11, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: mn1
178 वस्तूंवरील कर 28 टक्क्यांवरून 18 टक्के
5गुवाहाटी, दि. 10 (वृत्तसंस्था) : ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीत झालेला गोंधळ, कराचे दर आणि त्याचा व्यापारी व उद्योजकांना होणारा त्रास यावरून विरोधकांनी रान पेटवले असताना गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘जीएसटी’ परिषदेने करप्रणालीत बदल करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या निर्णयामुळे दैनंदिन वापराच्या तब्बल 178 वस्तूंवरील कर 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. त्याचबरोबर हॉटेलमधील खाणेही आता स्वस्त होणार आहे. वातानुकूलित व बिगरवातानुकूलित हॉटेलांवर लावण्यात आलेला 12 ते 18 टक्के जीएसटी आता 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
जीएसटी परिषदेची 23 वी बैठक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आणि 24 राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत गुवाहाटी येथे काल आणि आज झाली. या बैठकीत दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवरील कर कमी करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. या अपेक्षेनुसार परिषदेने तब्बल 178 वस्तूंवरील करात कपात करून तो 28 टक्क्यांवरून 18 टक्के केला आहे. हा नवा दर 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. मात्र, आरामदायी 50 वस्तूंवरील 28 टक्के कर कायम ठेवण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला. दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील करकपातीच्या निर्णयामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी जीएसटी परिषदेने 100 हून अधिक वस्तू आणि सेवांवरील कर कमी केला होता.
जीएसटी दर कमी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये डिओ, शॅम्पू आणि सौंदर्य प्रसाधनांचा समावेश आहे. 28 टक्के कर कायम ठेवण्यात आलेल्या वस्तूंच्या यादीत तंबाखू, सिगारेट आणि चैनीच्या गोष्टींचा समावेश आहे.
परिषदेने घेतलेल्या निर्णयांची माहिती जेटली यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली. 1 जुलै रोजी जीएसटीची अंमलबजावणी करताना कराचे टप्पे 0, 5, 12, 18 आणि 28 टक्के असे ठेवण्यात आले होते. यापूर्वी परिषदेच्या बैठकांमध्ये सुमारे 100 वस्तू व सेवांवरील कर कमी करण्यात आले होते. त्यानंतरही 227 वस्तू आणि सेवांवरील कर 28 टक्के होता. ही यादी कमी करून ती 62 पर्यंत आणावी, अशी शिफारस परिषदेच्या अंतर्गत असलेल्या स्थिरता समितीने दिली होती. मात्र, कराच्या या टप्प्यातून आणखी 12 वस्तू व सेवा वगळण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला. त्यामुळे 178 वस्तूंवरील कर आता 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. वॉशिंग मशीन, वातानुकूलन यंत्रणा अशा आरामदायी आणि तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट अशा 50 वस्तूंवरील कर 28 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. वातानुकूलित आणि बिगरवातानुकूलित रेस्टॉरंटवर लावण्यात आलेला 12 व 18 टक्के कर कमी करून 5 टक्के करण्यात आला आहे. मात्र, या हॉटेलांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. त्यामध्ये पंचतारांकित हॉटेलांचा समावेश नाही. खोलीभाडे साडेसात हजार रुपयांहून अधिक असलेल्या हॉटेलांचा समावेश पंचतारांकित हॉटेलांमध्ये होतो. या हॉटेलांवरील 28 टक्के कर कायम ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय 13 वस्तूंवरील कर 18 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा, 6 वस्तूंवरील कर 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याचा, 8 वस्तूंवरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याचा आणि 6 वस्तूंवरील 5 टक्के कर शून्य टक्के करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. त्याचबरोबर जीएसटी विवरणपत्रे भरण्यातही छोटे व्यापारी व लघुउद्योजकांना दिलासा देण्यात आला आहे. वार्षिक दीड कोटी रुपये उलाढाल असलेल्या व्यवसायांना आता जीएसटीआर-2 व 3 विवरणपत्रे भरण्यातून वगळण्यात आले आहे. त्यांना या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे मार्च 2018 पर्यंत फक्त जीएसटीआर-1 विवरणपत्रे भरावी लागणार आहेत. मात्र, त्यांना जीएसटीआर-3ब विवरणपत्रे दरमहा भरावी लागणार आहेत. या व्यतिरिक्त शून्य कर भरण्यास पात्र असलेल्या करदात्यांना विवरणपत्रांच्या विलंबाकरिता 200 रुपयांऐवजी फक्त 20 रुपये दंड आकारण्यात येणार असून कर भरण्यास पात्र असलेल्या करदात्यांनाही दिलासा देण्यात आला आहे. या करदात्यांना विवरणपत्रांच्या विलंबासाठी आता 200 रुपयांऐवजी 50 रुपये दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी दिली.
जीएसटी परिषदेने आज घेतलेल्या निर्णयांमुळे चॉकलेट, खाद्यपदार्थ, मार्बल, प्लायवूड, आफ्टर शेव्ह, डिओ, वॉशिंग पावडर, ग्रॅनाईट, सॅनिटरी नॅपकिन, सूटकेस, वॉलपेपर, लेखन साहित्य, घड्याळे, खेळणी, मार्बल आदी वस्तू 18 टक्के कराच्या श्रेणीत येणार आहेत. मात्र, रंग, सिमेंट, वॉशिंग मशीन, फ्रिज, तंबाखू, सिगारेट आदींसह चैनीच्या वस्तूंवरील 28 टक्के कर कायम ठेवण्यात आला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: