Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अर्धवट जळालेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी होणार
ऐक्य समूह
Saturday, November 11, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: rmn2
न्यायाधीशांच्या उपस्थितीत ‘इन कॅमेरा’ उत्तरीय तपासणी
5सांगली, दि. 10 (प्रतिनिधी) : आंबोली घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या अनिकेत कोथळे याच्या मृतदेहाचे विच्छेदन शुक्रवारी मिरजेतील शासकीय रुग्णालयात न्यायाधीशांच्या उपस्थितीत करण्यात आले. साडेचार तासांच्या या प्रक्रियेनंतर मृतदेह अ‍ॅनॉटॉमी आणि डीएनएसाठी पाठविण्यात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी सांगितले.
दरम्यान, अनिकेतच्या नातेवाइकांशी संपर्क साधून पोलिसांनी मृतदेहातील काही अस्थी अंत्यसंस्कारासाठी देण्याची तयारी दर्शविली; परंतु नातेवाइकांनी मृतदेह जेवढा आहे, तेवढा देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आता यापैकी नेमके काय करायचे, याचा निर्णय  सीआयडीचे अधिकारी घेतील, असे सांगण्यात आले.
कोठडीत खून करून नराधम पोलीस गुन्हेगारांनी अनिकेत कोथळेचा मृतदेह आंबोलीच्या घाटात जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी चौथ्या दिवशीही उमटत राहिले. समाजातील विविध घटकांनी गुन्हेगार पोलिसांच्या कृत्याबाबत संताप व्यक्त करणे सुरू ठेवले आहे. पोलीस अधीक्षकांसह ठाण मांडून बसलेल्या आणि पोलिसिंग बाजूला ठेवून भलतेच उद्योग करणार्‍या अधिकार्‍यांच्या बदल्या करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अनिकेत कोथळेच्या नातेवाइकांनीही संशयित पोलीसअधिकार्‍यांच्या विरोधात स्वतंत्र तक्रार दिली आहे. केवळ संबंधित पोलीस अधिकारीच नव्हेत तर अन्य काही जण अनिकेतच्या हत्येला जबाबदार असून त्यांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नातेवाइकांनी लावून धरली आहे.
आंबोली घाटातून ताब्यात घेतलेला अनिकेतचा अर्धवट जळालेला मृतदेह गुरुवारी सायंकाळी विच्छेदनासाठी मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलला गराडा घातला. 
शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शवविच्छेदन प्रक्रियेस सुरुवात झाली.  मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती पी. पी. खापे यांच्या उपस्थितीत ‘इन कॅमेरा’ साडेचार तास शवविच्छेदन प्रक्रिया झाली. मृतदेहाच्या काही भागाचे नमुने डीएनए चाचणीसाठी पुणे आणि मुंबईला पाठवण्यात  येणार आहेत. अनिकेत खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे जाईपर्यंतचा तपास करणारे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, इतर अधिकारी, सिव्हिल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर, अधिकारी उपस्थित होते. अनिकेतचे नातेवाईकही बसून होते. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी नातेवाइकांच्या भावना लक्षात घेऊन मृतदेहाबरोबर मिळालेल्या काही अस्थी अंत्यविधीसाठी देण्याची तयारी दर्शविली; परंतु जेवढा आहे तेवढा संपूर्ण मृतदेह देण्यास पोलिसांनी नकार दिला. याबाबत अप्पर पोलिस अधीक्षक बोराटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जेवढा मृतदेह हाती लागला आहे, तो संपूर्ण अ‍ॅनाटॉमी आणि डीएनएसाठी पाठविण्यात आला आहे. मिरजेतील शवविच्छेदनाचा अहवाल राखून ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला गेल्याने पुढील कार्यवाही त्यांच्या निर्णयानुसार होईल.
सरकारकडून गंभीर दखल
सांगली शहर पोलीस ठाण्यातील प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून मी तातडीने आढावा बैठक बोलावली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. बैठकीत आढावा घेतल्यानंतर वास्तव समोर येत आहे. आणखी कोणाचा सहभाग आहे, याची माहिती घेऊन तसा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. दरम्यान, शहर पोलीस ठाण्यासमोर पोलीस अधीक्षकांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. अनिकेत कोथळे याच्या हत्येला जबाबदार धरून अधीक्षकांची बदली करावी. पोलीस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांचीही चौकशी करावी. अटक केलेल्या पोलिसांच्या मालमत्तेची चौकशी करावी. या प्रकरणी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे, असे स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: