Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मंत्रालयात तरुण शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न
ऐक्य समूह
Saturday, November 11, 2017 AT 11:46 AM (IST)
Tags: mn3
मंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर नाट्यावर पडदा
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नसल्याचा निषेध करण्यासाठी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील मसला खुर्दच्या ज्ञानेश्‍वर साळवे या तरुण शेतकर्‍याने शुक्रवारी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर जाऊन आत्महत्येचा इरादा जाहीर केला. सुमारे दीड तास चाललेल्या या नाट्यामुळे मंत्रालयात खळबळ उडाली होती. अखेर शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील आणि दीपक केसरकर यांनी त्याची समजूत काढली आणि तब्बल दीड तास चाललेल्या या नाट्यावर पडदा पडला.
शेतमालाचे कोसळलेले भाव, कर्जमाफीच्या अंमलबजावणीस होणारा विलंब यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने आज मंत्रालयात ‘शोले’स्टाईल आंदोलन करून  खळबळ उडवून दिली. मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीत सातव्या मजल्याच्या सज्ज्यावर हा तरुण चढला. दुपारी चारच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे मंत्रालय परिसरात गोंधळ उडाला. पोलीस, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी तेथे गर्दी केली. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याने उडी मारलीच तर त्याला वाचविण्यासाठी खालील बाजूस जमिनीवर जम्पिंग सीटही लावण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याशीच बोलणार असल्याचे सांगून या शेतकर्‍याने इतर कोणाशीही बोलण्यास नकार दिला. यात सुमारे तासभर गेला. पाचच्या सुमाराला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे तेथे आले. तावडे यांनी या तरुण शेतकर्‍याशी चर्चा करून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. सुमारे वीस मिनिटांच्या वाटाघाटीनंतर या तरुणाला सज्ज्यावरुन सुखरूप उतरवण्यात यश आले. त्यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, कापूस आणि सोयाबीनचे कोसळलेले दर आदी गोष्टींमुळे निराश होऊन या तरुणाने हे पाऊल उचलल्याचे समजते. त्याने वैयक्तिक स्वरूपाची कोणतीही मागणी केली नसल्याचे समजते. राज्य सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, ही त्याची प्रमुख मागणी असल्याचे सांगण्यात आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: