Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एनपीएमुळेच ‘कराड जनता’ बँकेवर कारवाई
ऐक्य समूह
Saturday, November 11, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: re1
ठेवीदारांच्या रकमेला धक्का लागणार नाही
5कराड, दि. 10 : दि कराड जनता सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असून बँकेतील ठेवीदारांची सर्व रक्कम बँकेत पूर्ण सुरक्षित आहे. ठेवीदारांच्या एका पैशालाही धक्का लागणार नाही.  आर्थिक  घोटाळा अथवा गैरव्यवहाराचा कोणताही ठपका रिझर्व्ह बँकेने अथवा सरकारी लेखापरीक्षकांनी बँकेवर ठेवलेला नाही. पूर्वीच्या कर्ज वसुलीतील असमाधानकारक कामगिरीचा ठपका ठेवीत बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून पुढील काही दिवस नवीन कर्ज वाटप आणि विशिष्ट कारणांशिवाय ठेवीदारांना ठेव रक्कम परत करण्यास निर्बंध घातले आहेत. अचानक आलेल्या या संकटावर सर्वांच्या सहकार्याने लवकरात लवकर मात करून बँक सुस्थितीत आणू. बँकेच्या अस्तित्वाला आणि ठेवीदारांच्या ठेवींना कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही.  या अडचणीच्या काळात सर्वांनी संयमाने व धैर्याने साथ द्यावी, असे आवाहन बँकेचे चेअरमन राजेश पाटील-वाठारकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन विकास धुमाळ, ज्येष्ठ संचालक दिलीपभाऊ चव्हाण, राजीव शहा यांच्यासह सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी विलासराव सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
 राजेश पाटील म्हणाले, कराड जनता सहकारी बँकेने आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना पूर्वी काही प्रकल्पांना विशेषतः साखर कारखाना, फीड मिल, दुग्ध व्यवसाय, ऊस तोडणी कंत्राटदार, बांधकाम उद्योगांना कर्ज पुरवठा केला होता. 
या कर्जदारांकडून कर्जाची व्याजासह वेळेत परतफेड करून घेण्यात बँक अपयशी ठरल्याचा ठपका ठेवीत बँकेला रिझर्व्ह बँकेने पुढील सहा महिन्यात याबाबत आवश्यक पावले उचलण्याचे आदेश देत बँकेच्या दैनंदिन कामकाजावर काही निर्बंध घातले आहेत. बँकेच्या सन 2015-16 या आर्थिक  वर्षाच्या कामकाजाची तपासणी करीत असताना रिझर्व्ह बँकेने कर्ज वसुली विशेषतः एनपीएबाबत नाराजी व्यक्त केली होती. कराड जनता बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सूचनांवर विशेष लक्ष देवून मे 2017 पर्यंत कर्जवसुली कामकाजात लक्षणीय सुधारणा करून बँकेची आर्थिक  स्थिती मजबूत केली आहे. रिझर्व्ह बँकेने निर्बंध घालताना सदर सुस्थिती विचारात घेतली नाही. बँक ही स्थिती त्यांच्या  निदर्शनास पुन्हा आणून देईल.  यातून बँक लवकरच बाहेर पडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. रिझर्व्ह बँकेची 31 मार्च 2016 अखेरच्या सांपत्तिक  स्थितीची रेग्युलर तपासणी मे 2017 मध्ये झाली. या तपासणीमध्ये बँकेच्या एन. पी. ए. चे प्रमाण जास्त निघाल्याने बँकेवर काही निर्बंध घातले आहेत. यात सामान्य परिस्थितीत  एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.  विशिष्ट परिस्थितीत हीच मर्यादा आजारपण, शिक्षण, विवाह आदींसाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. या  स्थितीतून बाहेर येण्यासाठी बँकेला सहा महिन्यांचा रिव्हायव्हल कालावधी देण्यात आला आहे. तत्पूर्वीच आम्ही यातून बाहेर पडू असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.
 बँकेची दि. 31 मार्च 2017 ची आर्थिक  स्थिती
बँकेचे सभासद 32 हजार 203, भाग भांडवल 16 कोटी 87 लाखांवर,  निधी 75 कोटी 65 लाखांवर, एकूण ठेवी 657 कोटी 21 लाखांवर, एकूण कर्जे 385 कोटींच्यावर, एकूण व्यवसाय 1042 कोटी 37 लाखांवर, सी. डी. रेशिओ 58.60 टक्के, एकूण गुंतवणूक 162 कोटी 34 लाख, खेळते भांडवल 815 कोटींच्यावर, सी. आर. ए. आर. 13.66 टक्के, प्रती सेवक व्यवसाय 3 कोटी 31 लाखांवर, थकबाकी 29 कोटी 53 लाखांवर, थकबाकी 7.67 टक्के, निव्वळ एन. पी. ए. 38 कोटी 92 लाख 68 हजार (11.04 टक्के) ऑडिट वर्ग अ , ढोबळ नफा 3 कोटी 6 लाख 6 हजार तर तरतुदी वजा जाता निव्वळ नफा 1 कोटी 12 लाख 76 हजार.
31 मार्च 2017 नंतरची बँकेची वसुली कारवाई
दि. 1 एप्रिल 2017 नंतर बँकेने एन. पी. ए.मध्ये प्रभावी प्रयत्न करून सिक्युरिटायझेशन कायदा कलम 91 व 101 चा वापर करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत काही कर्ज प्रकरणांमध्ये वसुली कारवाई करून थकबाकीदारांच्या प्रॉपर्टी ताब्यात घेतल्या आहेत. प्रोसिजरनुसार त्या प्रॉपर्टींची लवकरच लिलाव टेंडर्स काढून वसुली प्रक्रियेस बँक अंतिम रूप देत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील खात्यांचा समावेश आहे.
1) कुसुम राजाराम सूर्यवंशी, फोर्ट, मुंबई येथील निवासस्थान किंमत 5 कोटी 85 लाख रुपये. 2) महिपती रामचंद्र फडतरे, सांगली येथील निवासस्थान किंमत 1 कोटी 60 लाख रुपये. 3) अ‍ॅग्रीकेअर फूडस प्रोजेक्ट, सोलापूर किंमत 5 कोटींच्यावर. 4) अरिहंत ट्रेडर्स, पुणे जागा व इमारत किंमत 4 कोटी 25 लाख.5) सुपेकर लाईट हाऊस, कराड किंमत 2 कोटी 25 लाख. 6) इतर लहान कर्जदारांकडून साधारणतः 3 कोटींच्यावर.
वरीलप्रमाणे साधारणतः सुमारे 22 कोटी रुपये एवढ्या रकमेची वसुलीची कारवाई प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती पूर्ण करून रिझर्व्ह बँकेला रिव्हायव्हल प्रपोजल बँक सादर करणार आहे. त्यानुसार बँक लवकरच निर्बंधमुक्त होईल असा विश्‍वास चेअरमन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: