Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड जनता बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
ऐक्य समूह
Saturday, November 11, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: mn3
सभासद, ठेवीदार, खातेदार हवालदिल
5मुंबई, दि. 10 (वृत्तसंस्था) : वाढलेला एनपीए आणि कर्ज वसुलीतील असमाधानकारक कामगिरीमुळे कराड जनता सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार कराड जनताच्या खातेदारांना बचत, चालू ठेव खात्यांसह ठेव पावत्यांवरील1 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे बँकेचे हजारो सभासद, ठेवीदार व खातेदार हवालदिल झाले आहेत. त्याचबरोबर बँकेने नव्याने कोणतेही कर्ज देऊ नये, असे निर्बंध घातले आहेत.
या संदर्भात रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की बँकिंग नियंत्रण कायदा 1949 मधील कलम 56 आणि कलम 35 (अ) मधील उपकलम 1 नुसार रिझर्व्ह बँकेला दिलेल्या अधिकारांन्वये कराड जनता सहकारी बँकेवर 7 नोव्हेंबरपासून निर्बंध लादण्यात आले आहेत. या संदर्भात जारी केलेल्या निर्देशानुसार बचत खाते, चालू खाते अथवा अन्य खात्यांमधून कोणत्याही खातेदाराला 1 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही.
त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कराड जनता बँकेला कोणतेही नवीन कर्ज देण्यास, कर्जाचे पुनर्गठन व नूतनीकरण करण्यास, नव्या ठेवी घेण्यास, कोणतीही आगाऊ रक्कम देण्यास आणि कोणतीही गुंतवणूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर कराड जनता बँक देय असलेली कोणतीही रक्कम देण्यासाठी, कोणतीही तडजोड अथवा करार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. 
रिझर्व्ह बँकेच्या 7 नोव्हेंबरच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटींव्यतिरिक्त कराड जनता बँकेची कोणतीही मालमत्ता विकण्यास, हस्तांतरित करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. मात्र, कराड जनता बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे, असा  या निर्बंधांचा अर्थ घेऊ नये. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारेपर्यंत या निर्बंधांच्या अधीन राहून नियमित बँकिंग व्यवहार करता येतील. परिस्थितीनुसार या निर्देशांमध्ये सुधारणा करण्यात येईल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या निर्बंधांची माहिती कराड जनता सहकारी बँकेच्या आवारात सभासद, ठेवीदार, खातेदार व सर्व संबंधितांना ठळकपणे दिसेल, अशा पद्धतीने फलकावर लावण्यात यावी, असे आदेशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: