Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यातील आणखी एका टोळीला मोक्का
ऐक्य समूह
Tuesday, December 05, 2017 AT 11:42 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 4 : मटका व्यवसायासाठी दिलेले 1 लाख रुपये परत देत नसल्याने तक्रारदार युवकाला मारहाण करून रोख 5500 व दुचाकी जबरदस्तीने चोरून नेणार्‍या अनिल महालिंग कस्तुरे (रा.करंजे) व त्याचा साथीदार अक्षय सुनील जाधव उर्फ अक्षय बाँबे (रा.बसाप्पा पेठ) या दोघांवर मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,  शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनिल कस्तुरे व अक्षय जाधव यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील तक्रारदार याला मटका व्यवसाय सुरू करायचा असल्याने त्याने अनिल कस्तुरे याच्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदार याला पैसे दिल्यानंतर काही कालावधीनंतर अनिल कस्तुरे याने ते पैसे परत मागितले. फोनवरून पैशाची मागणी झाल्यानंतर तक्रारदार याने पैशांची जमवाजमव करण्यासाठी वेळ मागितला. तक्रारदाराला वेळ दिल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने अनिल कस्तुरे याने दि. 6 जून 2017 रोजी फोन केला. त्याच दिवशी सायंकाळी अनिल कस्तुरे व अक्षय जाधव या दोघांनी तक्रारदार याला करंजे येथे गाठले. पैशाची मागणी करून संशयित दोघांनी तक्रारदाराला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. यावेळी संशयितांनी  5500 रुपये जबरदस्तीने खिशातून काढून तक्रारदाराची दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली आणि तेथून ते पळून गेले.
 जबरी चोरी, दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, शिवीगाळ, दमदाटी, फौजदारीपात्र कट रचणे, अनाधिकारपणे जागेत प्रवेश करणे, कॉपीराईट असे विविध गुन्हे अनिल कस्तुरे व त्याच्या टोळीवर दाखल आहेत. अशाप्रकारे अनिल कस्तुरे हा टोळीच्या माध्यमातून बेकायदेशीर कृत्य करत होता. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या टोळीच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई व्हावी यासाठी शाहूपुरी पोलिसांनी प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे या गुन्ह्याचा तपास करणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: