Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वडूज येथील मटका चालवणारे तीन जण सहा महिन्यांसाठी तडीपार
ऐक्य समूह
Tuesday, December 05, 2017 AT 11:43 AM (IST)
Tags: re3
5सातारा, दि. 4 :  वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका चालवणार्‍या तीन जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी  चार तालुक्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीचा प्रमुख जयवंत बजरंग जाधव (वय 34), मयूर सोपान भोसले (वय 30), पृथ्वीराज बाळासाहेब चव्हाण (वय 32, सर्व रा. वडूज, ता. खटाव, जि. सातारा) यांचा समावेश आहे.
 ही टोळी वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा मटका जुगार चालवत होती. त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करून, अटक करून, तसेच सुधारण्याची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मागणी होत होती. त्यामुळे त्यांच्याकडून वडूज हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये यासाठी या टोळीतील प्रस्तावित तीनही इसमांना हद्दपार करण्याबाबत हद्दपार प्राधिकरण व सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे वडूज पोलीस ठाणे यांनी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावामुळे संदीप पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये खटाव, माण, कोरेगाव, कराड या चार तालुक्यातून सहा महिने कालावधीसाठी हद्दपारीचा आदेश दिला आहे.   
आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर 48 तासांच्या आत या इसमांनी हद्दपार झाले पाहिजे, असाही आदेश आहे. या कारवाईचे सर्वस्तरामधून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अशाच प्रकारे समाजात दहशत पसरविणार्‍या, समाजात बेकायदेशीर कारवाया करणार्‍या टोळ्यांच्या विरुद्ध तडीपारीची कारवाई सुरू आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: