Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुणे-सातारा एस. टी. प्रवासात युवतीच्या लॅपटॉपची चोरी
ऐक्य समूह
Thursday, December 07, 2017 AT 11:34 AM (IST)
Tags: lo4
एस.टी.ची वरात शहर पोलीस ठाण्यात
5सातारा, दि. 6 : स्वारगेट, पुणे ते सातारा या प्रवासादरम्यान एका युवतीचा लॅपटॉप बॅगेसह चोरीला गेल्याने खळबळ उडाली. चोरी शोधण्यासाठी एस.टी.च्या चालकाने एस. टी. बस थेट सातारा शहर पोलीस ठाण्याच्या दारात आणून उभी केली. त्यानंतर तपासणी करण्यात आली. एस.टी.ची वरात पोलीस ठाण्यात आल्यानंतर सर्वच प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला. 
याबाबत अधिक माहिती अशी, स्वारगेट येथून एस.टी. सातार्‍याला जायला निघाली त्यावेळी संबंधित युवतीने आपल्या बॅगेतून तिकीट काढून दाखवले होते. मात्र प्रवासादरम्यान ही बॅग लंपास झाल्याचे तिच्या लक्षात आले. बॅगेत लॅपटॉप आणि अन्य साहित्य असल्याने युवतीने तक्रार केली. या तक्रारीनुसार एस.टी. थेट सातारा शहर पोलीसठाण्यात नेण्यात आली. त्यावेळी सर्व प्रवाशांची तपासणी सातारा शहर पोलिसांनी केली. दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे रात्री उशिरा सातार्‍यात मुक्कामी येणार असल्याने पोलिसांना एस.टी. बसच्या चोरीचा तपास तातडीने मार्गी लावायचा होता. त्यामुळे शहर पोलीस कामाला लागले. पोलिसांनी तातडीने तपासणी सुरू केली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत लॅपटॉप सापडला नव्हता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: