Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा पालिकेच्या सभांना पोलीस संरक्षण द्या
ऐक्य समूह
Friday, January 05, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: lo3
महिला नगरसेविकेची मागणी; वसंत लेवे यांच्या कृतीवर बोट
5सातारा, दि. 4 : सातारा नगरपालिकेत होणार्‍या सभेतील कामकाजात सहभागी होण्यासाठी आम्ही असुरक्षित आहोत व तेथे भीतीचे वातावरण आहे, असा जोरदार आरोप भाजपच्या नगरसेविका सौ. सिध्दी पवार यांनी केला आहे. हा आरोप करताना त्यांनी थेट सातारा विकास आघाडीचे पालिकेतील आरोग्य समितीचे सभापती वसंत लेवे यांच्या कृतीवर बोट ठेवले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे धाव घेवून अर्ज दिल्याने पोलीस काय भूमिका घेणार हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.
नगरसेविका सौ. सिध्दी पवार यांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा नगरपालिकेच्या दि. 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या सदस्यांच्या वादावादीमध्ये वसंत लेवे यांनी केलेल्या वादावादी व धक्काबुक्कीमुळे सभागृहात आम्हाला महिला म्हणून असुरक्षित वाटते. सभागृहात असुरक्षित आणि भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सभा कामकाजात आम्हाला सुरळीतपणे सहभाग घेता यावा व मागील सर्वसाधारण सभेप्रमाणे कोणतेही अनुचित तथा भीतीदायक वातावरण निर्माण होवू नये म्हणून नगरपालिकेच्या विशेष सभेचे व सर्वसाधारण सभेचे कामकाज पोलीस संरक्षणात व्हावे, जेणेकरुन महिलांना सुरक्षित वाटून बिनदिक्कत काम करता येईल. दि. 6 जानेवारी आणि दि. 11 जानेवारी रोजी होणारी सर्वसाधारण सभा पोलीस संरक्षणात होणे गरजेचे आहे.
सातारा नगरपालिकेच्या इतिहासात पोलीस संरक्षणात सभा घ्यावी आणि आम्हाला असुरक्षित वाटते, असा अर्ज जिल्हा पोलीस प्रमुखांकडे एका महिला नगरसेविकेने करावा ही बाब खूप गंभीर आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी एक महिला नगराध्यक्षा सातारा पालिकेचे नेतृत्व करत आहे त्यावेळी असे घडावे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. जो काही प्रकार नोव्हेंबरमधील सभेमध्ये झाला होता तो लाजिरवाणाच होता. 
सातारा पालिकेची मान शरमेने खाली जाईल, असाच होता. मात्र आजही सातारा पालिकेत तसेच वातावरण असेल तर मात्र सातारची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सातारा पालिकेच्या सभागृहात काम करणार्‍या नगरसेवकांनीही आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: