Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

गोलंदाजांनी द. आफ्रिकेला 286 धावांत रोखले
ऐक्य समूह
Saturday, January 06, 2018 AT 11:41 AM (IST)
Tags: sp1
भारतालाही झटके; विराट कोहलीसह तीन फलंदाज तंबूत
5केपटाऊन, दि. 5 (वृत्तसंस्था) : मायदेशात सलग नऊ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करुन दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाला हा दौरा किती खडतर आहे, याची कल्पना केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशीच आली. उसळत्या व वेगवान खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखल्यानंतर यजमान गोलंदाजांनी पाहुण्या भारतालाही हादरवले. भुवनेश्‍वरकुमारच्या चार बळींच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 286 धावांमध्ये संपुष्टात आणला. मात्र, त्यानंतर मॉर्नी मॉर्केल, डेल स्टेन, व्हरनॉन फिलँडर या त्रिकुटाने प्रत्येकी एक
गडी बाद करत भारताची अवस्था दिवसअखेर 3
बाद 28 अशी केली आहे. कर्णधार विराट कोहलीही तंबूत परतला आहे.
पहिल्याच कसोटीत नाणेफेकीचा कौल कोहलीच्या विरोधात गेला. त्यानंतर यजमान संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जलदगती गोलंदाज भुवनेश्‍वरकुमारने 4 गडी घेत दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडले. त्याने सामन्यातील तिसर्‍याच चेंडूवर सलामीवीर डीन एल्गरला यष्टीमागे वृद्धीमान साहाकडे झेल द्यायला लावला. त्यानंतर त्याने धोकादायक हाशिम आमलाचा मामलाही संपवला. आमला अवघ्या तीन धावा काढून तंबूत परतला. त्या पाठोपाठ दुसरा सलामीवीर मार्क्रमलाही भुवीने पायचित पकडले. त्यामुळे यजमानांची अवस्था 3 बाद 12 अशी बिकट झाली. मात्र, कर्णधार डू प्लेसी आणि आक्रमक एबी डीव्हिलियर्स यांनी भारतीय गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवला. या दोघांनी 114 धावांची आक्रमक भागीदारी रचली. डीव्हिलियर्सने 84 चेंडूत 11 चौकारांची आतषबाजी करत 65 धावा केल्या. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या जसप्रीत बूमराहने डीव्हिलियर्सला बाद करुन कसोटी कारकिर्दीतील पहिला बळी नोंदवला. त्यानंतर डू प्लेसीला 62 धावांवर हार्दिक पांड्याने साहाकरवी झेलबाद केले. क्विंटन डी कॉकने 43 धावा करुन आणखी प्रतिकार केला. मात्र, भुवीने त्याचाही अडसर दूर केला. त्यावेळी यजमानांची अवस्था 6 बाद 202 अशी झाली होती. दक्षिण आफ्रिकेचे अव्वल फलंदाज कापून काढल्याने भारतीय संघ यजमानांना अडीचशेच्या आत गुंडाळेल, अशी दाट शक्यता होती. मात्र, फिलँडर, केशव महाराज व कॅगिसो रबाडा
यांनी भारताचे मनसुबे
उधळून लावले. दक्षिण आफ्रिकेचे शेपूट वळवळत असल्याने भारताचा कर्णधार विराट कोहली हतबल झाला होता. मात्र, शमीने फिलँडरचा अडसर दूर केला. त्यानंतर अश्‍विनने रबाडा आणि मॉर्नी मॉर्केल यांना तंबूत धाडले. अखेर दक्षिण आफ्रिकेचा डाव 286 धावांत संपुष्टात आला. भुवीने चार तर अश्‍विनने दोन बळी घेतले. हार्दिक पांड्या,
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बूमराह यांनी प्रत्येकी एक
बळी घेतला.
यजमानांचा डाव लवकर संपुष्टात आणल्याने भारतीय फलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची संधी होती. मात्र, भारतीय फलंदाजांनी हाराकिरी करत तीन खंदे मोहरे गमावले. सलामीवर मुरली विजय, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली हे ठरावीक अंतराने माघारी परतले. त्यामुळे भारताची अवस्था 3 बाद 28 अशी केविलवाणी झाली आहे. मॉर्केल, स्टेन व फिलँडर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. विजय आणि कोहली यांनी उजव्या यष्टीच्या खूप बाहेर असलेल्या चेंडूंना बॅट लावण्याची चूक केली तर धवन पुलच्या फसलेल्या फटक्यावर बाद झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्‍वर पुजारा पाच धावांवर आणि रोहित शर्मा शून्यावर नाबाद होता. आता भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी या दोघांसह हार्दिक पांड्यावर आहे.
धावफलक : दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : एल्गर झे. साहा गो. भुवनेश्‍वर 0, मार्क्रम पायचित गो. भुवनेश्‍वर 5, आमला झे. साहा गो. भुवनेश्‍वर 3, डीव्हिलियर्स पायचित गो. बूमराह 65, डू प्लेसी झे. साहा गो. पांड्या 62, डी कॉक झे. साहा गो. भुवनेश्‍वर 43, फिलँडर त्रि. गो. शमी 23, महाराज धावबाद 35, रबाडा
झे. साहा गो. अश्‍विन 26, स्टेन नाबाद 16, मॉर्केल पायचित
गो. अश्‍विन 2, अवांतर 6, एकूण 73.1 षटकांत सर्वबाद 286.
गोलंदाजी : भुवनेश्‍वर 19-4-87-4, शमी 16-6-47-1, बूमराह 19-1-73-1, पांड्या 12-1-53-1, अश्‍विन 7.1-1-21-2.
भारत (पहिला डाव) : विजय झे. एल्गर, गो. फिलँडर 1, धवन झे. व गो. स्टेन 16, पुजारा नाबाद 5, कोहली झे. डी कॉक गो. मॉर्केल 5, रोहित शर्मा नाबाद 0, अवांतर 1, एकूण 11 षटकांत 3 बाद 28.
गोलंदाजी : फिलँडर 4-1-13-1, स्टेन 4-1-13-1, मॉर्केल 2-2-0-1, रबाडा
1-0-1-0.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: