Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गांजाचे झाड जप्त करताना संशयिताने पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोेडले
ऐक्य समूह
Saturday, January 06, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: lo2
हवालदार जखमी; दाम्पत्यावर गुन्हा
5सातारा, दि. 5 : सदरबझार येथे गांजाचे झाड लावून त्याची जोपासना करणार्‍या वसीम इलियास शेख (वय 27) आणि शहजादी शेख (दोघे रा. सदरबझार) या संशियत पती-पत्नीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  घटनास्थळी छापा टाकून गांजा जप्त करण्याची कारवाई करताना संशयित महिला शहजादी शेख हिने पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पोलीस हवालदार किशोर तारळकर जखमी झाले आहेत. 
या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिला संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र तिचा पती पसार झाला आहे. दरम्यान, बेकायदा गांजाचे झाड लावणे, ते जगवणे, शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणीचा गुन्हा पोलीस दाखल करणार आहेत. जप्त केलेल्या झाड दीड किलो वजनाचे असून बाजारभावाप्रमाणे त्याची 10 हजार रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलीस हवालदार राहुल खाडे यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. सदरबझार येथे गांजाचे झाड असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या घटनेनंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता आमनेवाडा पाठीमागे गांजाचे झाड निदर्शनास आले. वसीम शेख याच्या घरालगत गांजाचे झाड सुस्थितीत होते. या झाडाला पाणी, खत घातले असून ते पडू नये यासाठी वायरीने बांधलेही होते. त्यावरुनच हे झाड जगवल्याचे पोलिसांची खात्री झाली. पोलिसांची चाहूल लागताच संशयित वसीम याने घटनास्थळावरुन पळ काढला. वसीमची पत्नी शहजादी घटनास्थळी होती. गांजाच्या झाडाबाबत माहिती विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत असताना त्या महिलेने पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली व त्याचवेळी तारळकर या पोलिसाला कुत्र्याने चावा घेतला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर गांजाचे झाड जप्त केले व पोलीस ठाण्यात आणले. जखमी पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली, हवालदार राहुल खाडे, अनिल पवार, दीपक झोपळे, किशोर तारळकर, शिवाजी भिसे, संजय भोईटे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: