Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
समाज तोडण्यापेक्षा जोडण्याची गरज : कुवळेकर
ऐक्य समूह
Saturday, January 06, 2018 AT 11:34 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 5 : आज समाजात दगड देणारे हात वाढताहेत. ग्रंथ महोत्सव मात्र लोकांना पुस्तक हातात देतोय. माणसांना एकमेकांविरुध्द उभे करुन राष्ट्र घडणार नाही. एकोप्याने राष्ट्र घडेल. परस्परांना समजून घेण्याने समाज पुढे जात असतो. समाज तोडण्यापेक्षा जोडण्याची गरज आहे,  असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी केले.
 ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन कुवळेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक दिनकर पाटील, ग्रंथ महोत्सवाचे अध्यक्ष शंकर सारडा, कार्यवाह प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस, डॉ. राजेंद्र माने, उपशिक्षणाधिकारी राजकुमार निकम,   प्रदीप कांबळे, साहेबराव होळ, डॉ. संदीप श्रोत्री, वि. ना. लांडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
विजय कुवळेकर पुढे म्हणाले, ग्रंथ वाचनाची परंपरा गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. ग्रंथांचा प्रसार व्हावा आणि त्याचा प्रचार व्हावा यासाठी ग्रंथ महोत्सवाची सुरुवात सातार्‍यात झाली. ग्रंथमहोत्सव गेली 18 वर्ष जिल्हा परिषदेच्या मैदानावर होतोय. हा महोत्सव अखंडपणे सुरु ठेवला आहे.
वाचनांची संस्कृती रुजवण्याचे हे चांगले काम आहे. सातार्‍याचा हा ग्रंथ महोत्सव साहित्यांची दिवाळीच आहे. वाचनापेक्षा आजकाल बघ्यांची संख्या वाढलेली आहे. वाचेल तो वाचेल या विनोबा भावे यांच्या वाक्याचे महत्त्व हल्लीच्या पिढीला कळले पाहिजे. माणूस घडवणे म्हणजे माणसाचे मन घडवणे आहे. केवळ पुस्तक वाचणार्‍या माणसाला शहाणा म्हणता येणार नाही. तर त्याच्या वाचनाला विचारांची जोड हवी. वाचनाने माणूस चांगला विचार करेल. राष्ट्राची प्रगती ही ग्रंथ वाचनातूनच होत असते. वाचन, विचार, संस्कृती ग्रंथाचे महत्त्व आपल्यापर्यंत पोहोचले, रुजले पाहिजेत. ग्रंथ, सहवास, वाचन सहवास यांचा सहवास तुम्हाला लाभला पाहिजे.  मराठी संपत चालली आहे, असे सांगणार्‍यांना ग्रंथ महोत्सव उत्तर आहे. दिनकर पाटील म्हणाले, वाचनाच्या संदर्भाने शाळेला भेट देत असतो तेव्हा अनेक समस्या येत असतात. 7 वी 8 वी मधील मुलांना वाचता येत नाही. वाचनाचे संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. ग्रंथमहोत्सव सुरू करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अनुदान दिले जाते. मुलांनी मोठ्या प्रमाणात वाचन केले पाहिजे. लिहिण्यासाठी खूप वाचावे लागते. वाचनाचे महत्त्व ग्रंथ महोत्सवातून दिसत आहे. पालकांनी मुलांना मोबाईल घेवून देण्यापेक्षा त्यांना पुस्तके घेवून द्यावीत. ग्रंथ महोत्सवास 18 वर्ष पूर्ण झाली ही कौतुकाची गोष्ट आहे. या ठिकाणी अनेक महोत्सव असतात पण ग्रंथमहोत्सवासारखी कोणाला सर येणार नाही. शंकर सारडा म्हणाले, सवलतीच्या योजना वाचकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीने ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केले जाते. नवनवीन आलेली पुस्तके आपण घ्यावीत, त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभर होणार आहे. पुस्तके आपल्या जीवनाला नवनवीन ओळख करून देत असतात. चार दिवस होणार्‍या ग्रंथ प्रदर्शनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.  प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनीता कदम, नंदा जाधव, प्रल्हाद पार्टे, प्रदीप कांबळे, शिक्षक, पालक विद्यार्थी उपस्थित होते. राजकुमार निकम यांनी आभार मानले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: