Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चप्पलचोर पाकिस्तान! भारतीयांच्या अमेरिकेत घोषणा
ऐक्य समूह
Tuesday, January 09, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: mn2
5 वॉशिंग्टन, दि. 8 (वृत्तसंस्था) : हेरगिरीच्या कथित आरोपाखाली पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने मृत्युदंड ठोठावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला पाकिस्तानने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा भारतीय-अमेरिकी आणि बलूच नागरिकांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये निषेध नोंदवला. या नागरिकांनी पाकिस्तान दूतावासाबाहेर आंदोलन करताना ‘हॅशटॅग चप्पलचोर पाकिस्तान’चे फलक हाती घेऊन पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने त्यांची गेल्या महिन्यात पाकिस्तानात भेट घेतली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या अधिकार्‍यांनी दोघींना त्यांचे बूट, मंगळसूत्र आणि बांगड्या काढायला लावल्या होत्या. त्याचबरोबर जाधव यांच्या आईला कपडेही बदलायला लावले होते. त्यांचे बूट पाकिस्तानी अधिकार्‍यांनी काढून घेऊन ते परत दिले नव्हते. या बुटांमध्ये कॅमेरा किंवा चिप असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. पाकिस्तानने जाधव यांची आई आणि पत्नीचा अपमान केल्याने भारतानेही तीव्र शब्दांत निषेध नोंदवला होता. त्याचबरोबर भारतीय जनतेतहीसंतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या संतापाची लाट आता अमेरिकेतही उसळली आहे. वॉशिंग्टन-मधील पाकिस्तान दूतावासाबाहेर भारतीय-अमेरिकी आणि बलूच नागरिकांनी पाकिस्तानच्या या कृतीचा निषेध केला.  
या कृत्यातून पाकिस्तानच्या वाईट आणि संकुचित मानसिकतेचे दर्शन झाले आहे, असे आंदोलक म्हणाले. ‘पाकिस्तानचा अर्थ काय? अमेरिकेकडून डॉलर आणि भारताकडून चपला खाणं!’ अशी घोषणाबाजीही त्यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: