Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पॉलिश करण्याच्या बहाण्याने 74 हजारांच्या दागिन्यांवर डल्ला
ऐक्य समूह
Tuesday, January 09, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: re2
5मल्हारपेठ, दि. 8 :  पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन हिंदी भाषिक तरूणांनी हातचलाखी करत 74 हजार रुपये किमतीच्या सोन्यावर डल्ला मारला.
विहे येथे दि. 6 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास फिर्यादी सिंधू काशिनाथ पाटील (वय 55, रा. विहे, ता. पाटण) या घरी असताना दोन अनोळखी हिंदी बोलणारे युवक तेथे आले. त्यांनी भांड्याची पावडर आहे. तांबे, पितळेची भांडी पॉलिश करुन देतो. पावडर विक्रीसाठी आलो आहे, असे त्यांना सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवत सिंधू पाटील यांनी घरातील तांब्याचा तांब्या पॉलिशसाठी त्यांच्याकडे दिला. त्यांनी त्यांच्याकडील पावडर लावून स्वच्छ करुन दिल्यानंतर हिंदीमध्ये सोना-चांदी को भी पॉलिश करते है, असे सांगितले असता पाटील यांनी त्यांच्या हाताच्या बोटातील अंगठी, गळ्यातील मणी मंगळसूत्र पॉलिश करण्यासाठी काढून दिले. त्यानंतर एका भांड्यात गरम पाणी ओतून त्यात हळद टाकून दागिने ठेवण्याचा बहाणा करत पाणी गार झाल्यानंतर भांड्यात ठेवलेले दागिने काढून घ्या, असे सांगून ते दोन युवक तेथून निघून गेले.
फिर्यादीने 15 मिनिटांनी चमचा घालून पाहिले असता भांड्यात एकही दागिना नसल्याचे दिसून आले. याबाबत दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात त्यांनी मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेश जावीर व कर्मचारी तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: