Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
ऐक्य समूह
Wednesday, January 10, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: na3
5श्रीनगर, दि. 9 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी सकाळी चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असून सुरक्षा दलांनी या चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली होती. दरम्यान, ठार झालेल्या एका दहशतवाद्याचे नाव फरहान वणी असून तो केवळ 18 वर्षांचा होता. त्याच्या वडिलांनी फेसबुकवर पोस्ट टाकून त्याला दहशतवादी संघटना सोडून घरी परत येण्याचे आर्जव केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी सकाळी परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली.
दरम्यान, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून फरहान वणी असे त्याचे नाव आहे. तो केवळ 18 वर्षांचा होता. तो कुलगाम जिल्ह्यातील खुदवानी गावचा रहिवासी होता. तो गेल्या वर्षी मे-जूनच्या दरम्यान दहशतवादी संघटनेमध्ये सामील झाला होता. त्याचे वडील गुलाम मोहम्मद वणी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फेसबुकवर एक पोस्ट टाकून त्याला दहशतवाद सोडण्याचे आणि कुटुंबात परतण्याचे आर्जव केले होते. अनंतनागमधील माजिद खान या दर्जेदार फुटबॉलपटूने शिक्षण आणि खेळ सोडून ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा मार्ग धरला होता. मात्र, त्याच्या आईचा व्हिडिओ संदेश सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर माजिद हा दहशतवादी संघटनासोडून घरी परतला होता.  
त्याच्यापासून प्रेरणा घेऊन गुलाम वणी यांनी फेसबुक पोस्टवरुन आपला मुलगा फरहानला दहशतवादी संघटना सोडण्यासाठी कळकळीची विनंती केली होती. तुझी आई या जगात तुझ्याइतके प्रेम कोणावरही करत नाही. तिच्यासाठी तरी तू घरी परत ये, असे आर्जव त्यांनी केले होते. मात्र, त्याचा परिणाम फरहानवर झाला नव्हता. अखेर आज सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत तो ठार झाला.
दरम्यान, सोमवारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत 206 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांशी लढताना 75 जवानांना वीरमरण आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: