Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मराठा विद्यार्थ्यांसाठी क्रिमिलेअर मर्यादा आठ लाखांवर
ऐक्य समूह
Wednesday, January 10, 2018 AT 11:32 AM (IST)
Tags: mn3
मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) :मराठा समाजाला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याने पुन्हा मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने आज घाईघाईने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ओबीसींसाठी असलेली क्रिमिलेअरची आठ लाख रुपयांची मर्यादा मराठा समाजासाठीही आठ लाख रुपये करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मराठा समाजाच्या प्रश्‍नांसंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली. याआधी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाख रुपये होती. ही मर्यादा आता आठ लाख रुपये करण्यात आली आहे. या बैठकीस उपसमितीचे सदस्य व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील उपस्थित होते.
प्लेसमेंट नसलेल्या आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणार्‍या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के फीची सवलत लागू केली जाणार आहे. मराठा समाजातील मुलांना उद्योगासाठी दहा लाख रुपयांचे  कर्ज  उपलब्ध करून दिले जाणार असून यासाठी वर्षाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या कर्जाचे संपूर्ण व्याज राज्य सरकार भरणार आहे, असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.
 मराठा विद्यार्थ्यांना 605 अभ्यासक्रमांसाठी फी सवलत दिली जाते. मात्र, पूर्वी विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागायची. आता 50 टक्के फी विद्यार्थ्यांना भरावी लागणार आहे आणि उर्वरित 50 टक्के फी सरकार थेट कॉलेजला देणार आहे. मराठा विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंटचे 24 कोर्सेस मोफत शिकवले जाणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: