Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
ऐक्य समूह
Thursday, January 11, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: lo1
करणार्‍यास दहा वर्षाची सक्तमजुरी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला
5सातारा, दि. 10 : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या अक्षय चंद्रकांत दगडे (वय 22, रा.भिरडाचीवाडी, ता.वाई) याला तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.व्ही.घुले यांनी 10 वर्ष सक्तमजुरी व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे मुलगी गर्भवती राहिल्याने प्रसूतही झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अत्याचाराची घटना एप्रिल व मे 2015 या दोन महिन्यात घडली आहे. पीडित मुलगी 13 वर्षाची असून ती खंडाळा तालुक्यातील आहे. 2015 मध्ये भिरडाचीवाडी येथे ती गेली होती. त्यावेळी अक्षय दगडे याने त्या मुलीला घरी बोलावून नेले व तिच्यावर अत्याचार केले.
या घटनेने मुलगी घाबरली होती. त्यातच अक्षयने तिला याबाबत कुठे वाच्यता झाल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरल्याने मुलीने कोणालाही, काहीही सांगितले नाही.
पुढे मुलगी गर्भवती राहिली व तिची प्रसूतीही झाली. सर्व घटनेनंतर अखेर त्या मुलीने भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 
सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पवार, जी. के.मोरे व फौजदार रेखा दुधभाते यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकार व बचाव पक्षाने जोरदार युक्तिवाद केला. या प्रकरणात एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अक्षय दगडे याला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.उर्मिला फडतरे यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस हवालदार शिरीष मोरे, शमशुद्दीन शेख, अविनाश पवार, अजित शिंदे, नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे यांनी सहकार्य केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: