Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गेल्या वर्षी पाकच्या 138 सैनिकांचा खात्मा
ऐक्य समूह
Thursday, January 11, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: mn1
भारतीय लष्कराच्या व्यूहात्मक कारवायांना मोठे यश
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) :जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार होत असताना भारतीय लष्करही त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद होत असताना लष्कराने मागील वर्षी नियंत्रण रेषेवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवायांमध्ये आणि ‘सर्जिकल स्ट्राइक’सारख्या व्यूहात्मक कारवायांमध्ये पाकिस्तानच्या 138 सैनिकांचा खात्मा केल्याची माहिती सरकारच्या गुप्तचर संस्थांच्या सूत्रांनी बुधवारी दिली. गेल्या वर्षात नियंत्रण रेषेवर भारताच्या 28 जवानांना वीरमरण आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय लष्कराच्या कारवायांमध्ये आपले जवान ठार झाल्याची कबुली पाकिस्तानी लष्कर देत नाही. अनेक वेळा ही जीवितहानी सामान्य नागरिकांची झाल्याचे पाकिस्तानी लष्कराकडून सांगण्यात येते. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी कारवाया आणि सीमेवर पाकिस्तानकडून होणार्‍या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत भारतीय लष्कराने कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय लष्कराने पाकच्या गोळीबाराला दिलेले प्रत्युत्तर आणि नियंत्रण रेषा ओलांडत डावपेचात्मक कारवाया करून पाकच्या 138 सैनिकांना कंठस्नान घातले तर 155 सैनिकांना जखमी केले. पाकिस्तानच्या गोळीबारात आणि अन्य घटनांमध्ये भारताचे 70 जवान जखमी झाले, असे सरकारच्या गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी सांगितले.
याबाबत भारतीय लष्कराला प्रतिक्रिया विचारली असता, पाकिस्तानचे किती सैनिक ठार झाले, त्याची माहिती देण्यास लष्कराने नकार दिला. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून होत असलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कर सडेतोड प्रत्युत्तर देत आहे आणि यापुढेही देत राहील, एवढेच भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले.
अधिकृत आकडेवारीनुसार, 2017 मध्ये पाकिस्तानकडून गोळीबाराच्या 860 घटना घडल्या. त्या आधीच्या वर्षात अशा 221 घटना घडल्या. या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर दिले गेले. मात्र, भारताच्या कारवायांमध्ये आपले सैनिक ठार झाल्याची माहिती जाहीर न  करण्याचे पाकिस्तानी लष्कराचे धोरण  आहे, असे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी कारगिल युद्धाचे उदाहरण दिले. कारगिल युद्धात पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले गेले. त्याचे पुरावेदेखील भारताने दिले. मात्र, पाकिस्तानने त्याची कबुली दिली नाही.
भारतीय लष्कराच्या केवळ पाच कमांडोंनी गेल्या वर्षी 25 डिसेंबर रोजी नियंत्रण रेषा ओलांडत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकच्या दहा ते बारा जवानांचा खात्मा केला होता. आपल्या वाढदिवशीच शहीद झालेल्या एका भारतीय जवानाच्या मृत्यूचा बदला भारतीय कमांडोंनी घेतला होता. आपले सैनिक मारले गेल्याची कबुली पाकिस्तानी लष्कराने ट्विटरद्वारे दिली होती. मात्र, ते ट्विट लगेचच काढून टाकण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने अशी कारवाई भारताने केलीच नसल्याचा दावा केला होता. गुप्तचर संस्थांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या स्नायपर्सनी गोळीबार करून गेल्या वर्षी पाकिस्तानच्या 27 सैनिकांना ठार केले तर पाकिस्तानी स्नायपर्सच्या गोळीबारात भारताच्या सात जवानांना वीरमरण आले. पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनास जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय लष्कराने अवलंबले. दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी पाठबळ देण्याची पाकिस्तानी लष्कराची चाल उधळून लावण्यासाठी भारतीय लष्कराने गेल्या वर्षी अनेक डावपेचात्मक कारवाया केल्या. गेल्या वर्षी मे महिन्यात पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने भारताच्या दोन जवानांचा शिरच्छेद केला होता. त्याला तीव्र प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य करत प्रचंड गोळीबार केला. त्यामध्ये पाकिस्तानचे अनेक सैनिक मारले गेले आणि अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे अनेकदा पाकिस्तानला भारताकडे शस्त्रसंधीसाठी आर्जवे करावी लागली. भारतीय लष्कराबरोबर सीमा सुरक्षा दलानेही आंतरराष्ट्रीय सीमेवर सप्टेंबरमध्ये केलेल्या ‘ऑपरेशन अर्जुन’मध्ये पाकिस्तानचे माजी सैनिक, आयएसआय आणि पाक रेंजर्सच्या अधिकार्‍यांची घरे आणि शेतांना लक्ष्य केले होते. या कारवाईनंतर गोळीबार थांबवण्याची विनंती सीमा सुरक्षा दलाला करण्याची वेळ पाकिस्तानी रेंजर्सवर आली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: