Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राहुल फटांगडे खून प्रकरणी तिघांना अटक
ऐक्य समूह
Thursday, January 11, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: mn3
5पुणे, दि. 10 (प्रतिनिधी) : भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीमध्ये राहुल आबाजी फटांगडे या युवकाच्या खून प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी तीन जणांना अहमदनगर येथून अटक केली आहे. त्यांना शिक्रापूर नायायालयात हजार करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हे तिघेही तरुण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले होते. या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्या नावांबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. दरम्यान, भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आणखी आठ जणांना अटक केली असून या प्रकरणी अटक केलेल्यांची एकूण संख्या 51 झाली आहे.
भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारीला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी दोन गटात वाद झाल्याने वाहने व दुकानांवर दगडफेक करण्यात आली. शेकडो वाहनांची जाळपोळही करण्यात आली. नगर रस्त्यावरील शिक्रापूर भागात राहुल बाबाजी फटांगडे (वय 28, रा. कान्हूर मसाई, घोलपवाडी, ता. शिरूर) याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. कोरेगावशेजारच्या सणसवाडीमध्ये राहुल फटांगडेची काही जणांनी हत्या केली होती. त्याने अंगात शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला शर्ट घातला होता. त्यामुळे त्याला लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा होती.  
मृतावस्थेत सापडलेल्या राहुलच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांकडून अज्ञात जमावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आरोपींचा शोध सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करून बुधवारी सायंकाळी शिक्रापूर येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकारणी आणखी आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: