Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सज्जनगडावरील पितळी कासवाची मोडतोड
ऐक्य समूह
Friday, January 12, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: re1
अज्ञाताकडून कृत्य; परळी परिसरात संताप
5परळी, दि. 11 : सज्जनगडावर बुधवारी रात्री अज्ञाताकडून दहशत माजवून मुख्य समाधी मंदिरासमोर असणार्‍या पितळ आणि पंचधातूच्या कासवाची मोडतोड करून या कासवाचे धातूचे दोन पाय लंपास करण्यात आले आहेत. तसेच समाधी मंदिर पाठीमागे असलेल्या धाब्याच्या मारुती मंदिर रस्त्यावर असणार्‍या ट्यूबलाईटचीही तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना निदर्शनास आल्यावर समर्थभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधी मंदिर परिसरात बुधवारी रात्री एका अज्ञाताने खूप काळ दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने रात्री उशिरा समोर असणार्‍या पितळ आणि पंचधातूच्या कासवाची मोडतोड करून त्याचे मागील दोन पाय चोरून नेले आहेत. त्यानंतर या अज्ञाताने समाधी मंदिर पाठीमागे असणार्‍या धाब्याचा मारुती मंदिर रस्त्यावरील ट्यूबलाईट फोडून टाकल्या आहेत. यावरच समाधानी न राहता त्याने परिसरात असणार्‍या गटारांची तोडफोड केली. ही घटना पहाटे येणार्‍या समर्थभक्त, ग्रामस्थ यांच्या निदर्शनास आली. यामुळे सज्जनगडावरील रहिवासी, समर्थ सेवा मंडळ, रामदास स्वामी संस्थान यांच्यासह परळी परिसरात संतापाची लाट व्यक्त होत आहे.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी अंगलाई देवी मंदिराचा दरवाजा तोडून त्यातील काही साड्या समोरील तटावर  जाळण्याचा प्रतापही याच अज्ञाताने केला असल्याची चर्चा परिसरात होती. सदर घटनेची नोंद अद्याप सातारा पोलीस ठाण्यात झाली नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: