Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोलीस बंदोबस्तातील पालिका सभेत चर्चेचे गुर्‍हाळ
ऐक्य समूह
Friday, January 12, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: lo2
श्र अशोक मोनेंच्या प्रहारामुळे प्रशासन, साविआ घायाळ श्र
5सातारा, दि. 11 : सातारा पालिकेच्या मागील सभेवेळी झालेल्या धक्काबुक्कीमुळे भाजप व नगरविकास आघाडीने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेच्या इतिहासात प्रथमच पोलीस बंदोबस्तात सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. मात्र, या सभेत विषयपत्रिकेवरील 34 विषयांवर चर्चेचे गुर्‍हाळ रंगले. आश्‍चर्य म्हणजे, मागील सभेत एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे आरोग्य समितीचे माजी सभापती वसंत लेवे आणि विरोधी पक्षनेते अशोक मोने यांची एका विषयावर दिलजमाई झाल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक विषयांवर उपसूचना, त्यावर चर्चा आणि मतदान, असा खेळच जणू या सभेत रंगला. अशोक मोने यांनी विविध विषयांवरुन केलेल्या प्रहारामुळे प्रशासन, साविआ घायाळ झाली. मात्र, बहुमताच्या जोरावर 34 पैकी 33 विषय मंजूर करुन एक विषय तहकूब ठेवण्यात आला.
सातारा पालिकेच्या मागील सभेत गोंधळ झाल्याने गुरुवारी होणार्‍या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सभागृहाच्या दाराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते तर साध्या वेशातील पोलीस सभागृहात उपस्थित होते. प्रारंभी दुखवट्याच्या ठरावानंतर नगरसेवक किशोर शिंदे, बाळू खंदारे, आशा पंडित, अतुल चव्हाण यांचे रजेचे अर्ज मंजूर करण्यात आले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील पहिल्याचविषयावर चर्चा रंगली. मागील सभेचा कार्यवृत्तांत कायम करणे, या विषयाला नविआ आणि भाजपने उपसूचना मांडली. मागील सभेत न वाचता, चर्चा न होता विषय मंजूर करण्यात आल्यामुळे ते नामंजूर करावेत, अशी मागणी झाली. साविआने बहुमताच्या जोरावर सर्व विषय मंजूर केले आहेत. विकासकामांवर चर्चा होणे आवश्यक आहे. साविआने आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. मागील सभेत केलेल्या दांडगाईचा निषेध नोंदवत असून पोलीस संरक्षण मागायला लागणे लज्जास्पद आहे. त्यामुळे मागील सभा गृहीत धरू नये, अशी मागणी नविआचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी केली.
मागील सभेच्या विरोधात 308 खाली जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्या विषयांवर पुन्हा सभा घ्यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी केली. मात्र, सर्वांनी सहकार्य करावे. सभागृह व्यवस्थित चालावे, ही सर्वांची जबाबदारी आहे. आम्ही सातारकरांच्या हिताचे कार्य करत आहोत. तुम्हीही जबाबदारीने वागावे. मागील सभा कायद्याला धरुन होती. त्यामुळे सर्व विषय मंजूरझाल्याचे साविआच्यावतीने अ‍ॅड. बनकर यांनी सांगितले. त्यावर अ‍ॅड.खामकर यांनी आक्षेप घेतला. एकीकडेसहकार्य करा म्हणायचे आणि दुसरीकडे चुकीचे पायंडे पाडायचे, असे ते म्हणाले. सत्तेच्या बळावर विषय मंजूर करायचे. उपसूचना विचारात घ्यायच्या नाहीत. चर्चाकरायची नाही, मग सभा घेताच कशाला, असा प्रश्‍न मोने यांनीकेला. विरोधकांचे महत्त्व सत्ता-धार्‍यांना कळायला हवे. यापूर्वी असेकधीही घडले नव्हते. 
याबाबत मुख्याधिकार्‍यांनी मुद्दे सांगावेत, असे मोने म्हणाले. त्यावर ही बाब न्यायप्रविष्ट असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सांगितल्यावर मतदान घेण्यात आले. त्यात उपसूचना 20 विरुद्ध 14 मतांनी फेटाळण्यात आली.
शहरातील पाच प्रमुख रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावरही खल झाला. भाजप आणि नविआने उपसूचना मांडली; परंतु योग्य सूचना असली तरी आता केवळ प्रस्ताव पाठवणार आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन रस्ते करायचे आहेत. त्यामुळे पुढील 25 वर्षे रस्ते करायला लागणार नसून शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे अ‍ॅड. बनकर यांनी सांगितले. त्यावर सत्तारुढ आघाडी संवाद साधत नाही. मागील वेळी पालिकेच्या इतिहासात कधीही न झालेली गोष्ट झाली, असे भाजप गटनेते धनंजय जांभळे यांनी सांगताच त्याला साविआच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. उपनगराध्यक्ष राजू भोसले यांनीही पूर्ण विचाराअंती हे रस्ते घेतले आहेत. चांगला विषय मंजूर करावा, असे सांगितले. त्यावर प्रस्ताव दुरुस्त करुन पाठवा, असे मोने यांनी सांगितल्यावर विषय मंजूर करण्यात आला. शहर वाहतूक आराखड्यावरही चर्चा रंगली. त्यावर चर्चा होऊन नवीन सिग्नल यंत्रणा बसवणे आणि वारंवार अतिक्रमणे हटवणे हे विषय वगळून वाहतूक आराखडा मंजूर करण्यात आला.
शहरातील रस्त्यांसाठी 3 कोटी रुपयांच्या विषयाला नविआने उपसूचना मांडली. नगरेसवक शेखर मोरे-पाटील म्हणाले, प्रस्तावित रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासावा. त्यानंतर नवीन रस्ते करावेत. शहरातील इतर अनेक रस्ते खराब आहेत. त्यांची कामे करणे आवश्यक आहे. अशोक मोने यांनी ही कामे साविआ आणि भाजपने वाटून घेतल्याचा आरोप केला. नविआ नगरसेवकांच्या वॉर्डातील रस्ते घेतलेले नाहीत. हा भेदभाव का? दुजाभाव न करता सर्वांची
कामे घेतली जावीत, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मोने यांनी एका वॉर्डापुरते मर्यादित राहू नये. प्रथमदर्शनी तसे वाटत असले तरी तसे नाही. यावर्षी जे पैसे येतील त्यात विचार करू, असे
साविआचे पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी सांगितल्यावर उपसूचना फेटाळण्यात आली.
अग्निशमन दलासाठी नव्याने घेण्यात येणार्‍या वाहनांच्या विषयावरही नविआने उपसूचना देत पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. त्यावर अ‍ॅड. बनकर यांनी स्पष्टीकरण दिल्याने उपसूचना मागे घेण्यात आली आहे. सदरबझार ग्रंथालयासमोर पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या विषयावरुन मोने यांनी अभियंत्याला धारेवर धरले. ती जागा खासगी आहे की पालिकेची, हे स्पष्ट होत नाही. अभियंते सभागृहात काहीही उत्तरे देतात, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर मोने, अ‍ॅड. बनकर यांच्यात चर्चा होऊन हा विषय मंजूर करण्यात आला. अपंग व्यक्तींसाठी राखीव निधी देण्याच्या विषयावर नविआने तर सदरबझारमध्ये प्रस्तावित शॉपिंग सेंटर बांधण्याच्या विषयाला सिध्दी पवार यांनी उपसूचना मांडली. आधी बांधण्यात आलेल्या शॉपिंग सेंटर्समधून पालिकेला उत्पन्न मिळते का, याचे उत्तर अजून देण्यात आलेले नाही तरीही वारंवार असे विषय घेऊन जनहित याचिका दाखल करण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. भाडेवाढ करण्यासाठी त्रिस्तरीय समिती नेमणार असल्याचे सांगितले होते; परंतु अजूनही ती नेमली नाही. वैशिष्ट्यपूर्ण निधी असा वापरणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. विचारपूर्वक परिपूर्ण अंदाजपत्रक मांडलेले नाही. निदान कागदोपत्री तरी योग्य प्रस्ताव तयार करा, असे सांगत मोने यांनीही प्रशासनाला चिमटा काढला. त्यावर पूर्व विभागातील या
पहिल्याच शॉपिंग सेंटरला विरोध करू नका, असे अ‍ॅड. बनकर यांनी सांगितले. त्यानंतर उपसूचनेवर मतदान घेण्यात आले. यावेळी नविआ आणि भाजपच्या सिध्दी पवार वगळता इतर नगरसेवक तटस्थ राहिल्याचे चित्र दिसले.
त्यानंतर वसंत लेवे यांनी स्वच्छता अभियानात योगदान देण्याचे आवाहन करत सातारा पालिका पहिल्या दहामध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. आरोग्य विभागातील रिक्त पदे वारसाहक्काने भरण्यास लेवे यांनी आक्षेप घेतला. विशेष म्हणजे मागील सभेत एकमेकांच्या अंगावर धावून जाणार्‍या मोने व लेवे यांनी या विषयावर एमकेकांना साथ दिली. दोघांच्याही आग्रही मागणीमुळे हा विषय तहकूब ठेवण्यात आला. त्यानंतर नगराध्यक्ष सौ. माधवी कदम यांनी उपनगराध्यक्ष राजू भोसले यांच्याकडे सभेचा चार्ज देऊन त्या निघून गेल्या. राजू भोसले हे नगराध्यक्षांच्या खुर्चीत बसल्याने सर्वच नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर सोमवार पेठेत नवीन इमारत बांधण्याच्या विषयाला भाजपने उपसूचना दिली तर या भागात इतर इमारती रिकाम्या असताना नवीन इमारत कशासाठी.
ठेकेदार पोसण्याचा मक्ता पालिकेने घेतला आहे का, असे
आक्षेप मोने यांनी घेतले. शॉपिंग कॉम्प्लेक्सपेक्षा हॉस्पिटल बांधावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावरुन सौ. स्मिता घोडके व सुजाता राजेमहाडिक यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यावर समाधान न झाल्याने हा विषय मतदानासाठी टाकण्यात आला. ही उपसूचना 19 विरुद्ध 14 अशा मतांनी फेटाळण्यात आली. राजवाडा येथील शौचालयाचा करार वाढवण्याच्या मुद्यावरही चर्चा रंगली. गुरुवार पेठेत आरक्षित असलेले खेळाचे मैदान व प्राथमिक शाळा विकसित करण्यावर चर्चा झाली. या विषयावरील उपसूचना
साविआने बहुमताच्या जोरावर फेटाळली. एकंदरीत पोलीस बंदोबस्तात झालेल्या या सभेत चर्चेचे गुर्‍हाळ रंगले. साविआचे बहुमत असल्याने नविआ व भाजपने अनेक विषयांवर उपसूचना मांडूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: