Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून पुन्हा बचावले
ऐक्य समूह
Friday, January 12, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: mn2
पायलटच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागे लागलेले हेलिकॉप्टर अपघातांचे शुक्लकाष्ठ सुरूच असून गुरुवारी पुन्हा एकदा दैव बलवत्तर आणि पायलट सतर्क असल्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला. लँडिंग सुरू असतानाच हेलिकॉप्टरच्या मार्गात वायर आल्याने ते पुन्हा वर नेण्यात आले. या प्रकरणी ग्राऊंड अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या आत चौथ्यांदा अशी घटना घडल्याने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाईंदर येथे एस. के. स्टोन चौकीजवळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण येथील घोडबंदर वर्सोवा पुलाचे भूमिपूजन आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. मुंबईतील एक कार्यक्रम उरकून त्यांचे हेलिकॉप्टर भाईंदर येथील सेव्हन इलेव्हन शाळेच्या प्रांगणात उतरणार होते. या शाळेच्या इमारतीतून दुसर्‍या इमारतीवर केबलची वायर गेली होती. मुख्यमंत्री आणि गडकरी यांचे हे हेलिकॉप्टर उतरत असताना वैमानिकाला अचानक केबल दिसल्याने हेलिकॉप्टर पुन्हा हवेत झेपावले.
मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यानंतर रस्तेमार्गे मुंबईला रवाना झाले. 25 मे रोजी मुख्यमंत्री लातूर दौर्‍यावर असताना निलंगे येथे हेलिकॉप्टर दुर्घटना टळली होती. 7 जुलै रोजी अलिबाग येथे मुख्यमंत्री बसण्यापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये  तांत्रिक  बिघाड  झाल्याचे लक्षात आल्याने मुख्यमंत्र्यांना तत्काळ दूर नेण्यात आले होते. त्यानंतर गेल्याच महिन्यात नाशिक येथून ‘टेक ऑफ’ घेेतेवेळी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे लक्षात आल्याने हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवण्यात आले होते.
आज हेलिकॉप्टर लँड होताना दोन इमारतींच्या मधून हेलिकॉप्टर खाली येऊ लागले. तेवढ्यात दोन इमारतींच्या मध्ये लटकत असलेली केबलची वायर पायलटला दिसली. त्याने पुन्हा हेलिकॉप्टर
‘टेक ऑफ’ केल्याने अनर्थ टळला. अवघ्या सहा महिन्यांच्या आत चौथ्यांदा अशी घटना घडल्याने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: