Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाचगणीतील महिलांना गंडा घालणार्‍या सातारच्या महिलेवर फसवणुकीचा गुन्हा
ऐक्य समूह
Saturday, January 13, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: re4
5पाचगणी, दि. 12 : पाचगणी आणि परिसरातील महिलांकडून लघुउद्योगासाठी प्रशिक्षण व कच्चा माल पुरवणे आणि संस्थेत काम देण्यासाठी पैसे गोळा करून गंडा घालून ऐनवेळी पोबारा करण्याच्या तयारीत असणार्‍यासातार्‍याच्या एका महिलेवर पाचगणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. त्यामुळे पाचगणी व परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातार्‍यातील कोडोली येथे राहणारी विजया सत्यवान दुबले (वय 36) या महिलेने पाचगणी येथे आपल्या स्वामी समर्थ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या नावाचे ऑफिस उघडले होते. या ठिकाणी महिलांना घरगुती पद्धतीने अगरबत्ती, फरसाण, चिवडा पॅकिंग या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर महिलांना कच्चा माल देऊन तो पॅकिंग करून घ्यायचा व त्यांना  त्या बदल्यात आकर्षक मोबदला देण्याचे सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या कार्यालयात बर्‍याच महिलांना उद्योगाची स्वप्ने दिसू लागली. महिलांकडून तयार झालेला माल विकण्यासाठी स्मार्ट मुलांनाही पगारावर नेमण्यात आले. अगरबत्ती प्रशिक्षणासाठी प्रत्येक माहिलेकडून 1260 रुपये गोळा केले. मार्केटिंगच्या मुलांकडून 2260 रुपये घेण्यात आले होते. पाचगणी, दांडेघर, भिलार, काटवली, शिंदेवाडी, खिंगर, वेळे, वाई अशा विविध ठिकाणांवरून सुमारे 150 ते 200 महिलांकडून विजयाने विना पावतीने पैसे गोळा केले. मोठ्या उद्योगाचे स्वप्न दाखवून तायघाट येथील एका माहिलेकडून 30 हजार रुपये आणि पाचगणीतील एका माहिलेकडून 36 हजार 500 रुपये घेतले. सुरुवातीला काही मोजक्या महिलांना त्यांनी प्रशिक्षण देऊन उद्योगासाठी माल दिला. परंतु नंतर हा माल मिळणे बंद झाल्याने महिलांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. महिनाभर परिस्थिती चांगली असल्याने बर्‍याच महिला बळी पडल्या. काही गरीब महिलांनी पदरमोड करून जमवलेली पुंजी घरातील लोकांना न माहिती देता विजयाकडे सोपवली. काही दिवसांनी विजया माल देण्यास टाळाटाळ करू लागली. फोनही उचलत नव्हती. त्यामुळे महिला हताश झाल्या. मंगळवारी विजया दुबले ही पाचगणीतील आपल्या सर्व साहित्यासह पोबारा करण्याच्या तयारीत होती. त्यात ती यशस्वीही झाली होती. परंतु यातील काही महिलांच्या सतर्कतेमुळे तिला सातारा एस. टी. तून उतरवून ऑफिसमध्ये कोंडून ठेवले. त्या दिवशी 100 च्या वर महिला गोळा झाल्याने तिने विविध कारणे देऊन वेळ मारून नेली. परंतु आपली फसवणूक झाली असल्याची भावना महिलांमध्ये झाल्याने काल रात्री उशिरा यातील प्रणाली रोहित बागडे, रा. पाचगणी यांनी विजयाच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. यावरून या महिलेला पाचगणी पोलिसानी ताब्यात घेतले आहे. पाचगणी पोलीस ठाण्याच्या सपोनि. तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस फौजदार एस. व्ही. कदम व त्यांचे सहकारी तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: