Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
ऐक्य समूह
Saturday, January 13, 2018 AT 11:37 AM (IST)
Tags: re6
5फलटण, दि. 12 : फलटण-दहिवडी रस्त्यावर, पृथ्वी चौकात आज (शुक्रवार) सकाळी 9 च्या सुमारास भरगाव ट्रकने मागून धडक दिल्याने या ट्रकच्या खाली सापडून वृद्ध दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
याबाबत शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रक (क्र. एम. एच. 45-0078) पृथ्वी चौकातून नाना पाटील चौकाकडे जात असताना आपल्या कापड दुकानाकडे बजाज एम 80 (क्र. एम. एच. 11 सी 8853) या दुचाकीवरुन निघालेले साहेबराव अण्णा राऊत (वय 60 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, फडे हॉस्पिटल मागे, फलटण) यांना पाठीमागून ठोकरल्यामुळे ते गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची खबर मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे ते जागेवरच कोसळले. लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आले. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून ट्रक चालक तात्या उत्तम माने, रा. सापटणे (टेंभुर्णी जवळ), ता. माढा, जि. सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
स्वप्नील विष्णू गायकवाड यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक मुंढे तपास करत आहेत.  
सायंकाळी 4.30 वाजता शोकाकूल वातावरणात धुळदेव, ता. फलटण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या दोन वर्षात रिंगरोड परिसरात अपघातांची मालिका सुरू असून यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींना अपंगत्व तर काहींना मोठ्या रुग्णालयीन खर्चाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या रिंगरोड वरून जाणार्‍या वाहनांची पर्यायी मार्गाने वाहतूक होण्यासाठी शहराबाहेर होणार्‍या प्रस्तावित मोठ्या रिंगरोडला कधी मुहूर्त लागणार आहे, असा सवाल फलटणकर करत आहेत. रिंगरोडवरील अनेक भागात वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात तर या मार्गाने सध्या ऊस वाहतूक, मोठे ट्रक व इतर वाहने ये-जा करतात. परंतु या वाहनांच्या वेग मर्यादेकडे कोण लक्ष देत नसल्याने आजपर्यंत अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: