Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

ट्वेंटी-20 संघात सुरेश रैनाचे पुनरागमन
ऐक्य समूह
Monday, January 29, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: sp3
5मुंबई, दि. 28 (वृत्तसंस्था) : कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जिंकून टीम इंडियाने काहीशी प्रतिष्ठा राखल्यानंतर आता एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्‍या ट्वेंटी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून डावखुरा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने या संघात पुनरागमन
केले आहे.
ट्वेंटी-20 साठी 16 सदस्यांच्या या संघाचे नेतृत्व कर्णधार विराट कोहलीकडे राहणार असून 18 ते 24 फेब्रुवारी दरम्यान ट्वेंटी-20 मालिका खेळवली जाणार आहे. निवड समितीने
टी-20 मालिकेसाठी सुरेश रैनाला पुन्हा संघात स्थान दिले असून रैना या संधीचे सोने करणार का, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे.
फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रैनाने इंग्लंडविरुद्ध गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये शेवटचा टी-20 सामन खेळला होता. जवळपास वर्षभरानंतर त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत रैनाने उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार म्हणून शेवटच्या काही सामन्यांमध्ये मैदान गाजवले. त्यानंतर भारतीय संघातील निवडीसाठी आवश्यक असलेल्या ‘यो यो’ चाचणीतही तो उत्तीर्ण ठरल्याने त्याला भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आलेल्या भुवनेश्‍वरकुमार व शिखर धवन यांनीही या संघात पुनरागमन केले आहे. शार्दुल ठाकूर व जयदेव उनाडकट यांनाही संघात जागा मिळाली आहे. महेंद्रसिंग धोनी हा मुख्य यष्टीरक्षक असून दिनेश कार्तिकची राखीव यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रमुख खेळाडू संघात परतल्यामुळे श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या दीपक हुडा, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर व बसिल थम्पी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 सामना 18 फेब्रुवारी रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येणार
आहे. पुढील दोन सामने अनुक्रमे 21 फेब्रुवारी
रोजी सेंच्युरियन आणि 24 फेब्रुवारी रोजी केपटाऊन
येथे होतील.
भारताचा टी-20 संघ पुढीलप्रमाणे : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, सुरेश
रैना, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, मनीष पांडे,
अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्‍वरकुमार, जसप्रीत बूमराह, जयदेव उनाडकट, शार्दुल
ठाकूर.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: