Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

पाकचा 203 धावांनी खुर्दा; भारत अंतिम फेरीत
ऐक्य समूह
Wednesday, January 31, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: sp2
5ख्राइस्टचर्च, दि. 30 (वृत्तसंस्था) : 19 वर्षांखालील क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने पारंपरिक व कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या डावाचा अवघ्या 69 धावांत खुर्दा करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. शुभमन गिलचे शतक, कर्णधार पृथ्वी शॉ व मनज्योत कालरा यांची सलामीची भागीदारी आणि ईशान पोरेलचे 17 धावांतच 4 बळी या कामगिरीच्या जोरावर भारताने तब्बल 203 धावांनी विजय मिळवला. आता विजेतेपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारी लढत रंगणार आहे.
यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 272 धावा केल्या. कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोत कालरा यांनी 89 धावांची सलामी दिली. पृथ्वी शॉ 41 धावा करून 16 व्या षटकात बाद झाला. त्यानंतर कालराही 47 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या शुभमन गिलने टिच्चून फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. त्याने 94 चेंडूत 102 धावांची सुरेख खेळी केली. शुभमनने एक बाजू लावून धरली असताना दुसरीकडे पडझड सुरू होती. देसाई, पराग, अभिषेक शर्मा हे स्वस्तात बाद झाले. मात्र, ए. एस. रॉयने शुभमनला चांगली साथ दिली. रॉयने 33 धावांचे योगदान दिले. डावातील शेवटच्या चेंडूवर शुभमनने शतक पूर्ण केले. यंदाच्या विश्‍वचषकातील भारताकडून झळकवले गेलेले हे पहिलेच शतक ठरले. त्यामुळे भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले.
या आव्हानासमोर खेळताना पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे दबावाखाली होते. भारतीय संघातील वेगवान व फिरकी गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करून पाकिस्तानी फलंदाजांना फटकेबाजीची संधी दिली नाही. त्यांना क्षेत्ररक्षकांचीही सुरेख साथ लाभली. शतकवीर शुभमनने क्षेत्ररक्षणातही कौशल्य दाखवले. त्याने फाईन लेग आणि स्लीपमध्ये दोन अप्रतिम झेल टिपले. भारतीय गोलंदाजांच्या मार्‍यापुढे पाकिस्तानचे फलंदाज फारसे तग धरू शकले नाहीत. मध्यमगती गोलंदाज ईशान पोरेलने सुरुवातीलाच इम्रान शाह व मुहम्मद झैद आलम यांना बाद करून पाकिस्तानला धक्के दिले. त्यानंतर रोहेल नाझीरने थोडा प्रतिकार केला. त्याला परागने तंबूत धाडले. धावफलकावर अवघ्या 37 धावा असताना पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर पाकिस्तानची पडझड सुरूच राहिली. अखेर त्यांचा डाव अवघ्या 69 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून ईशानने 17 धावांतच चार बळी घेतले. शिवा सिंग व पराग यांनी प्रत्येकी दोन गडी टिपून ईशानला सुरेख साथ दिली. पाकिस्तानच्या अवघ्या तीन फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला. पाकच्या एकाही फलंदाजाला 18 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.
19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये भारताने 12 तर पाकने 8 विजय मिळवले आहेत. यापूर्वी 2014 मध्ये 19 वर्षांखालील विश्‍वचषक स्पर्धेत भारताने पाकवर 40 धावांनी विजय मिळवला होता. यंदाच्या विश्‍वचषकात भारताने पापुआ न्यू गिनी, झिम्बाब्वे आणि बांगलादेशचा पराभव केला होता तर अफगाणिस्तानकडून
पराभव स्वीकारल्यानंतर पाकने आयर्लंड, श्रीलंका
आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: