Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

आता द. आफ्रिकेविरुद्ध वनडेचा रणसंग्राम
ऐक्य समूह
Thursday, February 01, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: sp1
5डर्बन, दि. 31 (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत पाय ठेवल्यापासून प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणार्‍या भारतीय संघाचा आता एकदिवसीय क्रिकेट मालिकेत यजमान संघाशी रणसंग्राम होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसरा सामना जिंकून भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आपला जम बसवला आहे. तिसर्‍या कसोटीतील विजयाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेसाठी आत्मविश्‍वास मिळाला आहे. मात्र, कसोटी मालिकेप्रमाणेच या मालिकेतही भारताची मुख्य मदार गोलंदाजांवरच राहणार आहे. सहा सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना उद्या (गुरुवार) किंग्जमीडच्या मैदानावर रंगणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाज कसोटी मालिकेत धडपडताना दिसले. मात्र, भारतीय गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली होती तरी फलंदाजांच्या अपयशामुळे पहिले दोन कसोटी सामने भारताला गमवावे लागले होते. या प्रतिकूल परिस्थितीतून सावरत भारताने तिसर्‍या कसोटीत कामगिरी उंचावली. जोहान्सबर्ग येथील वाँडरर्सच्या कमी-अधिक उसळी आणि वेग असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी यजमान फलंदाजांची भंबेरी उडवून संघाला आवश्यक असलेला विजय मिळवून दिला. ज्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवतात, तशाच प्रकारच्या खेळपट्टीवर यजमान संघाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे ही खेळपट्टी त्यांना ‘धोकादायक’ वाटली, यातच सारे काही आले. या कसोटीत 63 धावांनी मिळवलेल्या या दणदणीत विजयामुळे भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेसाठी आत्मविश्‍वास गवसला आहे.
किंग्जमीडमध्ये खेळताना आपण खेळपट्टीचा फायदा उठवू शकतो, असा विश्‍वास भारतीय गोलंदाजांना आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 237 आहे तर दुसर्‍या डावातील सरासरी फक्त 183 आहे. त्यामुळे या मैदानावर गोलंदाजांचीच हुकूमत चालते, हे निर्विवाद सत्य आहे. या परिस्थितीत नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.
भारताच्या संघातील भुवनेश्‍वरकुमार, जसप्रीत बूमराह, मोहम्मद शमी हे सीम गोलंदाज एकदिवसीय मालिकेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण सर्व एकदिवसीय सामने प्रकाशझोतात खेळवण्यात येणार आहेत. कसोटी मालिकेत हिरव्यागार खेळपट्ट्यांवर हे त्रिकूट कमालीचे यशस्वी ठरले असून त्यांनी तिन्ही सामन्यांमध्ये यजमान संघाच्या 20 विकेटस् घेतल्या होत्या. भुवीने दोन कसोटींमध्ये 18.75 च्या सरासरीने 10 तर शमीने तीन कसोटींमध्ये 17.06 च्या सरासरीने 15 बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या बूमराहनेदेखील 25.21 च्या सरासरीने तीन कसोटींमध्ये 14 बळी घेतले. शिवाय त्याने वाँडरर्सवर डावात पाच बळी घेण्याची किमयाही केली.
याच कामगिरीची पुनरावृत्ती एकदिवसीय मालिकेत करण्यासही ते उत्सुक आहेत. दक्षिण आफ्रिकेचा भरवशाचा फलंदाज एबी डीव्हिलियर्स बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेने बदली खेळाडूची निवड केलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाला चांगली संधी आहे. डीव्हिलियर्सच्या ऐवजी अननुभवी फलंदाज खाया झोंडो हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. डीव्हिलियर्सच्या अनुपस्थितीत यजमान संघाची फलंदाजांची मधली फळी काहीशी कमकुवत वाटत आहे.
भारतीय गोलंदाजांकडून चांगली कामगिरी होईल, अशी खात्री असताना आता फलंदाजांनाही आपली कामगिरी उंचावणे भाग आहे. कसोटी मालिकेतील चुकांची भरपाई एकदिवसीय मालिकेत करण्याची संधी भारतीय फलंदाजांना आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमालीची तफावत असल्याने भारतीय फलंदाज कसोटी मालिकेप्रमाणे या मालिकेतही अपयशी ठरतील, असे यजमान संघाला वाटत असेल तर त्यांची अपेक्षा फोल ठरण्याची शक्यताही आहे. भारतीय फलंदाजांना सतावण्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडूनही जास्तीत जास्त वेगवान गोलंदाज खेळवले जातील. गोलंदाजीचे नेतृत्व कॅगिसो रबाडाकडे असेल तर लुंगी एनगिडीला एकदिवसीय पदार्पपणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
संघ पुढीलप्रमाणे : भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंग धोनी, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्‍वरकुमार, जसप्रीत बूमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका : फाफ डू प्लेसी (कर्णधार), हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, जेपी ड्युमिनी, एडन मार्क्रम, डेव्हिड मिलर, खाया झोंडो, इम्रान ताहीर, मॉर्नी मॉर्केल, ख्रिस मॉरिस, लुंगीसानी एनगिडी, अँडिल फेलुक्वायो, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: