Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

पहिल्या सामन्यात ‘विराट’ची ‘अजिंक्य’ खेळी
ऐक्य समूह
Friday, February 02, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: sp1
भारताची सहा गडी राखून विजयी सलामी
5डर्बन, दि. 1 (वृत्तसंस्था) : कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 270 धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने आक्रमक शतकी खेळी केली. त्याने 112 धावा काढल्या तर रहाणेने 79 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने सहा सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कोहलीच्या विजयी खेळीमुळे प्रतिस्पर्धी कर्णधार फाफ डू प्लेसीचे शतक व्यर्थ ठरले.
दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येला उत्तर देताना भारतीय सलामीवीरांनी डावाची सुरुवात अतिशय आक्रमक केली. मात्र रोहित शर्मा मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद तर शिखर धवन चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद होऊन माघारी परतला. रोहितने 20 तर धवनने 35 धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेप्रमाणे पुन्हा अडचणीत सापडणार, अशी शक्यता असतानाच विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या शतकी भागीदारीने भारताचा विजय सोपा केला. अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या नादात विराट झेलबाद झाला. त्याला दुसर्‍या बाजूने अजिंक्य रहाणेने संयमी खेळी करुन चांगली साथ दिली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 189 धावांची शतकी भागीदारी केली. सामना जिंकण्यासाठी अवघ्या काही धावांची आवश्यकता असताना रहाणेचा अडसर दूर करण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आले. त्यानंतर कोहलीदेखील बाद झाला. मात्र, पांड्या व धोनीने उर्वरित मोजक्या धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने 45.3 षटकांतच विजयी लक्ष्य पूर्ण केले.
दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज आज भारतीय फलंदाजांवर अंकुश लावू शकले नाही. मॉर्केल, रबाडा, फेलुक्वायो या सर्व गोलंदाजांना आज भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीचा सामना करावा लागला. मॉर्केल आणि फेलुक्वायो यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी आफ्रिकेने कर्णधार फाफ डू प्लेसीच्या 120 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतासमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात आफ्रिकेचे फलंदाज भारताच्या फिरकीपटूंचा सामना करु शकले नाहीत. चांगल्या सुरुवातीनंतर आफ्रिकेचे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. अखेर डू प्लेसीने ख्रिस मॉरिस आणि तळातल्या फलंदाजांना हाताशी धरुन आफ्रिकेला 8 बाद 269 अशी आश्‍वासक धावसंख्या गाठून दिली. भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांनी अनुक्रमे तीन व दोन बळी घेतले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: