Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

‘खेलो इंडिया’ स्पर्धेत प्रतीक्षा खुरंगेकडे
ऐक्य समूह
Tuesday, February 06, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: sp1
महाराष्ट्राच्या खो-खो संघाचे कर्णधारपद
5फलटण, दि. 5 : केंद्र सरकारच्या क्रीडा विभागामार्फत आणि स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने दिल्ली येथील नेहरु स्टेडियमवर होणार्‍या ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी येथील मुधोजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा खुरंगे (राजुरी, ता. फलटण) हिची निवड झाली असून हा संघ स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.
बालेवाडी (पुणे) येथे दि. 20 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धापूर्व शिबिर झाले. त्यात महाराष्ट्राच्या खो-खो संघासाठी 12 मुलींची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रतीक्षा खुरंगेचा समावेश आहे.
प्रतीक्षा खुरंगेने याच वर्षी उमरिया (मध्य प्रदेश) येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय मुलींच्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या 17 वर्षांखालील मुलींच्या संघाचे नेतृत्व करुन सुवर्णपदक पटकावले होते.  स्कूल गेम्स फेडरेशनमार्फत झालेल्या विविध शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2013-14 मध्ये नुमकुरा (कर्नाटक) येथे झालेल्या 69 व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील गटात कांस्यपदक मिळविले. 2016 मध्ये राजीव गांधी खेल अभियानांतर्गत गांधीनगर (गुजरात) येथे झालेल्या 16 वर्षांखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. 2016-17 मध्ये रायपूर (छत्तीसगड) येथे झालेल्या 62 व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये 17 वर्षांखालील गटात सहभाग घेतला.
भारतीय खो-खो संघटनेच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतही खुरंगेने पदके पटकावली आहेत. 2016 मध्ये सूरत (गुजरात) येथे झालेल्या चौथ्या वेस्टझोन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले. 2016-17 मध्ये आझमगड (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या 36 व्या ज्युनिअर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले. 2017-18 इंफाळ (मणिपूर) येथे झालेल्या 18 वर्षांखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्येही तिने चमकदार कामगिरी केली होती.
प्रतीक्षाने शालेय जीवनात 3 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्यपदक मिळवून मुधोजी हायस्कूलचा नावलौकिक वाढवला आहे. प्रतीक्षाला प्रशिक्षक प्रशांत पवार, किरण विचारे, हेमंत खेडकर, अविनाश गंगतीरे, क्रीडाशिक्षक शिवाजी बनकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, कोल्हापूर विभाग क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील, नियामक मंडळ व्हाईस चेअरमन रमणलाल दोशी, मुधोजी हायस्कूलचे सरव्यवस्थापक पी. जी. शिंदे, सोसायटीचे प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य अर्जुन रुपनवर, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी प्रतीक्षा खुरंगे हिचे अभिनंदन केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: