Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

टीम इंडियाचा 3-0 आघाडीचा इरादा
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: sp1
भारताचा ‘एक्स’ फॅक्टर द. आफ्रिकेला पुन्हा भोवणार?
5केपटाऊन, दि. 6 (वृत्तसंस्था) : युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्या गूढ फिरकीने गेल्या दोन सामन्यांमध्ये तब्बल 13 बळी घेऊन टीम इंडियाला सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर हा ‘एक्स’ फॅक्टर तिसर्‍या सामन्यातही प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा सामना उद्या केपटाऊन येथील न्यूलँडस् मेदानावर होत आहे. हे मैदान यजमान संघासाठी भाग्यशाली ठरले असले तरी याच मैदानात त्यांना धूळ चारून मालिकेत 3-0 अशी आघाडी घेण्याचा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा निर्धार आहे.
एबी डिव्हिलियर्स जायबंदी झाल्याने एकदिवसीय मालिकेच्या सुरुवातीलाच यजमान संघाला मोठा धक्का बसला होता. या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसीने शतक ठोकले तरी भारतीय गोलंदाजांनी, विशेषत: फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेला तीनशेच्या आसपासही जाऊ दिले नव्हते. त्यानंतर 270 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शिखर धवन हे सलामीवीर लवकर बाद होऊनही विराट कोहलीचे शतक व अजिंक्य रहाणेच्या 79 धावांच्या खेळीमुळे भारताने सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. या मालिकेत दुखापतींनी यजमान संघाचा पिच्छाच पुरवला आहे. पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना फाफ डू प्लेसीचे बोट मोडले. त्यामुळे दुसर्‍या सामन्याला तो मुकला. दक्षिण आफ्रिकेला एडन मार्क्रम या नवख्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मोठे अपयश आले. युजवेंद्र चहलने पाच तर कुलदीपने 3 बळी घेऊन आफ्रिकेला 118 धावांतच गुंडाळले. यजमानांचा डाव जेमतेम 33 षटकांतच आटोपला. हे आव्हान रोहित शर्माच्या बदल्यात भारताने तब्बल 30 षटके राखून पार केले होते. शिखर धवनने
नाबाद अर्धशतक फटकावून आपला फॉर्म
परत मिळवला.
आता उद्या होणार्‍या तिसर्‍या सामन्यात यजमान संघाने यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकला वगळले आहे. त्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत असले तरी खराब कामगिरीमुळे त्याला डच्चू दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या जागी हेन्रिच क्लासन या नवोदित यष्टीरक्षकाला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. यजमान संघाला प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींबरोबरच भारतीय संघातील फिरकीपटूंच्या ‘एक्स’ फॅक्टरने सतावले आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय फिरकीपटूंनी आपला दबदबा ठेवल्याने तिसर्‍या सामन्यातही यजमान संघाचे फलंदाज त्यांना बिचकून खेळतील, अशी अपेक्षा आहे. फिरकीपटूंबरोबरच दुसर्‍या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनीही सुंदर कामगिरी करताना यजमानांना फारशा धावा दिल्या नाहीत. त्यामुळे टीम इंडियाची एकूण सांघिक कामगिरी यजमानांपेक्षा खूपच सरस आहे. भारताला रोहित शर्माचा फॉर्म वगळता अन्य कोणतीही चिंता नाही. मात्र, उद्याच्या सामन्यात विजयी चमूत बदल होण्याची शक्यता नाही. न्यूलँडस्ची खेळपट्टी कोरडी ठणठणीत असेल. या खेळपट्टीवर चेंडू चांगला उसळून बॅटवर येईल, असा अंदाज आहे. ही बाब भारतीय फलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान राखण्यासाठी यजमान संघाला सर्वस्व पणाला लावावे लागेल.
संघ पुढीलप्रमाणे : भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंग धोनी, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्‍वरकुमार, जसप्रीत बूमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्क्रम (कर्णधार), हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर, खाया झोंडो, हेन्रिच क्लासन, इम्रान ताहीर, मॉर्नी मॉर्केल, ख्रिस मॉरिस, लुंगीसानी एनगिडी, अँडिल फेलुक्वायो, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: