Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

मराठी भाषा-संस्कृतीच्या संवर्धक
vasudeo kulkarni
Friday, February 09, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: vi1
महाराष्ट्राची राजभाषा ‘मराठी’ असली, तरी इंग्रजी भाषेच्या अक्राळ-विक्राळ आक्रमणाने आणि चंगळवादी संस्कृतीच्या प्रभावाने माय मराठीला खग्रास ग्रहण लागले आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचे आम्ही वारसदार आहोत अशा अभिनिवेशाने, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, यासाठी आंदोलने करणार्‍यांनाही महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा बंद पडत आहेत, ही बाब गंभीर असल्याचे वाटत नाही. या पार्श्‍वभूमीवर मराठी मुलखापासून दूर असलेल्या पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात आणि नंतर हैदराबाद प्रांतात आता तेलंगणात मराठी भाषा आणि संस्कृतीची जपणुकीच्या कृतिशील चळवळीत डॉ. उषा जोशी आघाडीवर होत्या. उस्मानाबाद विद्यापीठात मराठी भाषेच्या प्राध्यापक असलेल्या उषा ताईंनी आपले पती द. पं. जोशी यांच्या समवेत, या परमुलखात मराठीचा वारसा जपायसाठी प्रयत्न सुरू ठेवले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आंध्र प्रदेश शाखेच्या त्या काही काळ अध्यक्षाही होत्या. परिषदेच्या ‘पंचधारा’ या नियतकालिकाच्या त्या संपादकही होत्या. सेतू माधवराव पगडी यांच्या ऐतिहासिक, संत साहित्य विषयक आणि अन्य ललित लेखनाच्या समग्र  साहित्याचे आठ खंड पगडी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने द. पं. जोशी आणि त्यांनी संपादित केले होते. डॉ. ना. गो. नांदापूरकर यांनी संग्रहित केलेल्या मराठवाड्यातल्या रामकथेवरील ओवी गीतांचा ‘मर्‍हाटी स्त्री रचित रामकथा हा ग्रंथही संपादित केला होता. या पाचशे पानांच्या ग्रंथाला त्यांनी लिहिलेली चिकित्सक प्रस्तावना हे ही या ग्रंथाचे वैशिष्ट्य होय. ‘समर्थ साहित्यातील आकृतिबंध’ या स्वतंत्र समीक्षा ग्रंथाचे लेखनही त्यांनी केले होते. या ग्रंथात समर्थ रामदासांच्या काव्याचा साहित्य रचनेच्या दृष्टीने केलेली चर्चा आणि त्याचा मराठी साहित्यावर झालेला परिणाम या विषयक त्यांनी केलेले हे संशोधन मूलगामी ठरले होते. हैदराबाद मधल्या साहित्य परिषद आणि मराठी संस्थांना, मराठी भाषकांना जोशी दाम्पत्याचा आधार वाटत असे. 6 वर्षांपूर्वी द. पं. जोशी यांचे निधन झाले आणि आता उषाताईंच्या निधनाने आंध्रप्रदेश-तेलंगणातील मराठी भाषेचा  वारसा जपणारे निष्ठावान व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. उस्मानाबाद  विद्यापीठात मराठीच्या  विभागप्रमुख असताना उषाताईंनी मराठवाडा आणि आंध्र प्रदेशातल्या    मराठी साहित्यिकांच्या रचनांचा मागोवा घेणारे संशोधन केले होते. अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शनही त्यांनी केले होते. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती  हा त्यांचा ध्यास होता. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर जोशी दाम्पत्य हैदराबादलाच राहिले आणि सलग पन्नास वर्षे त्यांनी मराठी भाषा समृद्ध करायचा प्रयत्न केला. तिथल्या मराठी भाषेच्या चळवळीचे नेतृत्व केले आणि मराठी संस्थांना मार्गदर्शनही केले अनेक साहित्यविषयक ग्रंथांचे संपादन करणार्‍या उषाताईंना आपण मराठी मातृभाषक आहोत, याचा विलक्षण अभिमान होता आणि तो त्यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत जपला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: