Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

डॉक्टर की कसाई?
vasudeo kulkarni
Friday, February 09, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: lolak1
 डॉक्टर म्हणजे रुग्णांना नवजीवन देणारा देवदूत, असा समज पूर्वी जनतेत होता. डॉक्टरांच्यावर रुग्णासह परिसरातील लोकांचाही प्रचंड विश्‍वास असे. डॉक्टर म्हणजे कुटुंबातला अविभाज्य घटक आणि सल्लागार असे. त्यांच्या शब्दाला मान असे. गेल्या काही वर्षात वैद्यकीय व्यवसायाचे बाजारू धंद्यात रूपांतर झाल्याने ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पनाच हळूहळू नाहीशी होत चालली आहे. मुंबई, पुण्यातल्या काही बड्या-कार्पोरेट रुग्णालयात रुग्णांना कसे लुटले-लुबाडले जाते, याचा जाहीर पंचनामा प्रसार माध्यमांनीही अनेकदा केला आहे. पैसा मिळवायसाठी काही डॉक्टरांना माणुसकीचाही विसर पडतो. आपण डॉक्टर आहोत, ते फक्त पैसा मिळवायसाठी अशा विकृतीने पछाडलेेले डॉक्टर तर गर्भलिंग चिकित्सा आणि बेकायदा गर्भपाताद्वारेही पैसे मिळवतात. सांगली जिल्ह्यातल्या मिरजे जवळच्या म्हैसाळ गावात डॉक्टर खिद्रापुरे याने अर्भकांच्या केलेल्या हत्यांचे प्रकरण प्रचंड गाजले होते. आता इचलकरंजीतल्या डॉ. अरुण पाटील आणि त्यांची पत्नी उज्ज्वला, यांनी जनावरांच्या  विक्रीसारखा अर्भकांच्या विक्रीचा धंदाच      सुरू केल्याचे उघड झाले आहे. इचलकरंजीतल्या जवाहर नगर विभागात डॉ. पाटील याचे सर्वसाधारण आणि प्रसूती रुग्णालय आहे. बीएएमएस म्हणजे होमिओपॅथीची पदवी असलेल्या या डॉक्टरने अर्भकांना विकून गडगंज पैसा मिळवल्याची ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. डॉ. अरुण बी. पाटील जनरल सर्जिकल अँड मॅटर्निटी हॉस्पिटल या नावाने तो रुग्णालय चालवत असे. या दवाखान्यात तो अविवाहित, विधवा आणि कुमारी मातांचा सांभाळ करीत असे. त्यांची प्रसूती झाल्यावर  त्यांच्याकडून अशी अर्भके कमी किंमतीत खरेदी करून नंतर लाखो रुपये किंमतीला या अर्भकांची विक्री करीत असे. कुमारी मातांना 2 लाख रुपये देऊन त्यांच्याकडून ही अर्भके तो विकत घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यांना मूलबाळ होत नाही, अशी दांपत्ये त्याच्याकडून नवजात अर्भकांची खरेदी करीत असे. इचलकरंजीचा तो काही काळ नगरसेवक होता. आपण कुमारी माता आणि विधवांचा सांभाळ करतो असा आभास निर्माण करून त्याने समाजात प्रतिष्ठाही मिळवली होती. त्याचे हे विकृत कसाई उद्योग महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी महिला संघटनांही कसे समजले नाहीत याचे आश्‍चर्य वाटते. त्याच्या या धंद्याच्या संदर्भात दिल्लीच्या केंद्रीय महिला बालकल्याण समितीकडे पुराव्यासह निनावी तक्रार दाखल झाली होती. त्याची शहानिशा करून समितीचे अध्यक्ष एम. रामचंद्र रेड्डी यांनी डॉ. प्रमिला जरद, कोल्हापूर जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष प्रियदर्शनी चोरगे यांच्यासह पाटील याच्या रुग्णालयावर अचानक छापा घालून, त्याच्या कारवायांचे आणि धंद्याचे पुरावेही जप्त केले आहेत. दोन बालकांची विक्री त्याने छत्तिसगड आण मुंबईत केल्याचेही या छाप्यात उघड झाले आहे.
कुमारी माता, अविवाहित आणि गर्भवती विधवांची समस्या समाजात अद्यापही गंभीर असल्याने अशा महिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या असहाय्यतेचा फायदा घेत डॉ. पाटील यांनी सेवाभावाच्या नावाखाली हा धंदा सुरू केला होता. महाराष्ट्रातल्या बालकाश्रमातले गैरव्यवहार यापूर्वी चव्हाट्यावर आले आहेतच. बालसंरक्षण कायदा अस्तित्वात असला, तरी या कायद्याचे रक्षकच अशा कसायांच्या कारवायांचा शोध घेण्यात अपयशी ठरत असल्यानेच
डॉ. खिद्रापुरे, डॉ. पाटील यांच्यासारख्या कसाई डॉक्टरांचे फावते. ही असली विकृत कीड वेळीच नष्ट करायला हवी. डॉ. पाटील याला सक्रिय आणि अप्रत्यक्षपणे मदत करणार्‍या टोळीचा पोलिसांनी शोध घेऊन, सार्‍यांनाच गजाआड करायला हवे. डॉ. पाटील याला माणुसकीचीही जाणीव राहिलेली नाही. तो मानवी देहातला मानवी देहांची विक्री करणारा कसाई आहे.                               
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: