Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

कौमार्य चाचणीच्या हद्दपारीसाठी...
ऐक्य समूह
Friday, February 09, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: st1
जात पंचायतींकडून होणारे अन्याय-अत्याचार थांबवणे, चुकीच्या प्रथांना पायबंद घालणे यासाठी सुमारे चार वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विशेष प्रयत्न सुरू केले. यातून जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्वात आला. परंतु ही लढाई एवढ्याने थांबण्यासारखी नाही. आता कंजारभाट समाजातील ‘कौमार्य चाचणी’च्या कुप्रथेचा मुद्दा पुढे आला. याच समाजातील काही तरुण-तरुणींनी या प्रथेविरुद्ध आवाज उठवला आहे.
त्या विषयी
भारतात अनेक वर्षांपूर्वी शिक्षणासाठी चळवळ सुरू झाली. त्यातून शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न करण्यात आले. शिक्षणातून समाजाची खर्‍या अर्थाने जडणघडण होऊ शकते, समाजाबरोबर देशाचा विकास होऊ शकतो, हे समाजसुधारकांना माहीत होते. म्हणूनच त्यांनी शिक्षणावर विशेष भर दिला. पुढे शिक्षणक्षेत्राचा बराच विस्तार झाला. या क्षेत्रात अनेक नवनवीन प्रयोग होऊ लागले. शिक्षितांची संख्या वाढली. कारकिर्दीचे नवनवे पर्याय उपलब्ध झाले. उच्चशिक्षितांनी विविध क्षेत्रांच्या विकासात मोलाचा हातभार लावला. आजही विकासाचे पुढचे टप्पे गाठण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिक्षणामुळे हे सारे साध्य झाले असले तरी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्याचा शिक्षणाचा मूळ उद्देश अजूनही साध्य होऊ शकलेला नाही. ते आव्हान कायम आहे. आजच्या विज्ञानवादी युगात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ नयेत यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत आहे. चार वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायतींकडून होणारे अन्याय-अत्याचार थांबवण्यासाठी, चुकीच्या प्रथांना पायबंद घालण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. याच प्रयत्नांमधून जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्वात आला. त्यानुसार काही गुन्हेही नोंदवण्यात आले. परंतु ही लढाई एवढ्याने थांबण्यासारखी नाही. त्यात आता कंजारभाट समाजातील ‘कौमार्य चाचणी’ सारख्या कुप्रथेचा मुद्दा समोर आला आहे. विशेष म्हणजे याच समाजातील काही तरुण-तरुणींनी या प्रथेविरुद्ध आवाज उठवला आहे.
अनिष्ट रूढी
आज विज्ञानाने मोठी झेप घेतली आहे. विज्ञानाच्या आधारे विविध बाबींचे स्पष्टीकरण करणे शक्य झाले आहे. असे असताना ‘कौमार्य चाचणी’ची प्रथा सुरू राहणे समाजाला पुन्हा मागे नेण्यासारखे आहे. नैसर्गिकत: तरुणींच्या योनीमध्ये एक पातळ पडदा असतो. शरीरसंबंधाच्या वेळी तो पडदा फाटून रक्तस्त्राव झाला तरच त्या तरुणीचे कौमार्य, पर्यायाने चारित्र्य अबाधित आहे, असे कंजारभाट समाजात समजले जाते. परंतु सध्याच्या काळात तरुणी शिक्षण, नोकरीसाठी घराबाहेर पडत असताना, विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असताना, दुचाकी चालवत असताना नकळत हा पडदा फाटू शकतो. कंजारभाट समाजात मात्र विवाहानंतर नवरी मुलीच्या कौमार्य चाचणीचा आग्रह धरला जातो. त्यासाठी त्या नवविवाहित पती-पत्नीला एका खोलीत पाठवले जाते. बाहेर सारेजण कौमार्य चाचणीत काय होणार, याची माहिती घेण्यासाठी थांबलेले असतात. अशा स्थितीत विवाहानंतरच्या पहिल्या शरीरसंबंधाच्या वेळी त्या तरुणीला रक्तस्त्राव झाला नाही तर ती चारित्र्यवान नाही, असे समजले जाते. चारचौघात चर्चिला जाणारा हा प्रकार संबंधित तरुणी तसेच तिच्या घरच्या मंडळींसाठी असहनीय असा असतो. आपली अब्रूच वेशीवर टांगली गेल्याची भावना त्यातून दिसत असते आणि हा मानसिक धक्का मोठा असतो.
अन्यायी प्रथेविरुद्ध लढा
खरे तर अशा तर्‍हेच्या कौमार्य चाचणीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. केवळ अशा चाचणीतून तरुणीची वर्तणूक नैतिक का अनैतिक, हे ठरवण्याचा हा काळच नाही. कंजारभाट समाजातील अनेक सुशिक्षितही अशा चाचणीवर ठाम आहेत. मात्र, आता या समाजातील तरुणी याला उघडपणे विरोध करत आहेत. आज अशा तरुणींची संख्या कमी असली तरी चळवळीच्या माध्यमातून अशा अनेक तरुणी पुढे येतील, अशी आशा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘जात पंचायत मूठमाती अभियान’ सुरू केले त्यावेळी कंजारभाट समाजातील जात पंचायतींकडून पाळल्या जात असलेल्या काही अन्यायकारक प्रथांची  माहिती समोर आली. त्यात कौमार्य चाचणीचा समावेश होता. त्यावेळी झालेल्या चचेतून या प्रथेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कंजारभाट समाजातीलच काही तरुण पुढे आले. त्यात कृष्णाई इंद्रेकर यांचा समावेश होता. इंद्रेकरांंनी 20 वर्षांपूर्वी पत्नीच्या कौमार्य चाचणीला विरोध केला होता आणि त्यासाठी धार्मिक पद्धतीऐवजी कोर्ट मॅरेज केले. परंतु कोर्ट मॅरेज केले म्हणून इंद्रेकरांना समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय जात पंचायतीने दिला. आता इंद्रेकरांनी कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीला विरोध करणार्‍या तरुण-तरुणींना पाठिंबा देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतलं आहे. त्यातून विविध ठिकाणी या प्रथेला विरेाध करणारे तरुण-तरुणी एकत्र येत आहेत. खरे तर कौमार्य चाचणीची कुप्रथा जात पंचायतविरोधी कायद्याद्वारे थांबवणे शक्य आहे. परंतु या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. या कायद्यांतर्गत येणार्‍या तक्रारी पोलिसांकडून लिहून घेतल्या जात नसल्याचीही उदाहरणे आहेत. मग या कायद्याची नीट अंमलबजावणी कशी होणार आणि जात पंचायतींच्या जाचक कारभाराला आळा कसा बसणार, हा खरा प्रश्‍न आहे. त्यासाठी जात पंचायत विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. या शिवाय कौमार्य चाचणीची प्रथा ‘राईट टू प्रायव्हसी’चा भंग करणारी असल्याने या कायद्यानुसारही तक्रार दाखल करता येण्यासारखी आहे. मात्र, याबाबतची माहिती या समाजातील तरुण-तरुणींपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्या दृष्टीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रयत्न राहणार आहेत.
बहिष्काराच्या धमक्या
कौमार्य चाचणीला उघडपणे विरोध करणार्‍या आणि स्वत:च्या विवाहात पत्नीची अशी चाचणी करू देणार नाही, असा निर्धार करणार्‍या विवेक तमाईचेकरला जात पंचायतीकडून बहिष्काराच्या धमक्या आल्या आहेत. त्याने पाच फेब्रुवारीपर्यंत हा निर्णय मागे न घेतल्यास जात पंचायत आपल्या पद्धतीने न्याय-निवाडा करेल, असं सांगण्यात आले आहे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसंच या चळवळीला पाठिंबा देणारे विवेकच्या पाठीशी उभे आहेत. त्याला आमच्याकडून वकिलांचं सहकार्य मिळणार आहे. मुख्यत्वे ही प्रथा कंजारभाट समाजातील सुशिक्षित समाजात घडतेय. या समाजाच्या जात पंचायत सदस्यांमध्ये डॉक्टर्स, इंजिनिअर्स, माजी महापौर आदींचा समावेश आहे. त्यांना परंपरेची भीती आहे. त्याचबरोबर आपली सत्ताकेंद्रंही सांभाळायची आहेत. म्हणून ते या अमानवी प्रथेचं समर्थन करत आहेत. आजवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नातून 13 जात पंचायती बंद झाल्या असून तसं या जात पंचायतींच्या पंचांनी जाहीरपणे सांगितलं आहे. परंतु अशा प्रकारचा विचार व्यक्त करण्यासाठी कंजारभाट समाजातील जात पंचायतीतील सदस्य समोर येत नाहीत. या शिवाय या प्रथेच्या विरोधात तक्रार करण्यासाठी  विवाहित तरुणीही समोर येत नाहीत. कारण एक तर त्या काही सांगण्याच्या मानसिकतेत नसतात. त्या पंचांच्या विरोधात काही बोलत नाहीत. शिवाय कसंही करून मुलीचा विवाह लावून द्यायचा असल्याने मुलींचे आई-वडीलही काही बोलत नाहीत. असं असलं, तरी आता याबाबत निर्माण होणारी जागरूकता विचारात घेण्यासारखी आहे. कौमार्य चाचणीच्या विरोधातील चळवळीला चांगला प्रतिसाद मिळतोय. यातून ही चळवळ व्यापक होईल आणि ही अनिष्ट, अन्यायकारी प्रथा बंद होईल, अशी आशा आहे.
(लेखक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह आहेत.)
    - कृष्णा चांदगुडे,
सामाजिक कार्यकर्ते

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: