Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्वच्छ सर्वेक्षण, बजेटच्या बैठका सोडून सातारच्या नगराध्यक्ष परदेश वारीवर
ऐक्य समूह
Friday, February 09, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: lo3
मुख्याधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या नविआच्या मागणीला जिल्हाधिकार्‍यांचे वैयक्तिक लक्ष घालण्याचे आश्‍वासन
5सातारा, दि. 8 : शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकाच्या बैठका सुरु आहेत. त्याचप्रमाणे इतर अनेक महत्त्वाचे प्रश्‍न असतानाही पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम या परदेश दौर्‍यावर गेल्या असून पालिकेचा कारभार वार्‍यावर आहे. सातारा पालिकेच्या कारभाराची तसेच मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्याबाबत कार्यवाही तसेच स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, अशी मागणी नगरविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदनाद्वारे केली. दरम्यान, या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी वैयक्तिक लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले.
जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी तक्रार केली आहे. त्यात मुख्याधिकार्‍यांनी नमुना क्र. 64 वर नगराध्यक्षांची सही न घेता   काही मर्जीतील ठेकेदारांची कामे न करता बोगस बिले काढली आहेत. त्यामुळे मुख्याधिकारीपदी हजर झाल्यापासून आजअखेर त्यांच्या कार्यकालात त्यांनी दिलेल्या सर्व बिलांचे फेर ऑडिट करुन अकौंट संहिता कोड 1971 चे नियम 147 ते 156, 181, 208, 270, 467, 475 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. त्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी अशी मागणी केली आहे.
निवेदन दिल्यानंतर बोलताना नविआचे पक्षप्रतोद अमोल मोहिते म्हणाले,  सातारच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. माधवी कदम या पदभार कोणाकडे न देताच दहा दिवसांसाठी परदेशवारीवर गेल्या आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या कोणत्याच विषयावर निर्णय होऊ शकत नाही. उपनगराध्यक्षांसह सातारा विकास आघाडीच्या कोणत्याच पदाधिकार्‍यांवर नगराध्यक्षांचा विश्‍वास नाही. आमच्या आंदोलनाच्या इशार्‍यावर उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी आठ दिवसात कार्यवाही करु, असे जोरदार उत्तर दिले आहे. पण नगराध्यक्ष नाहीत, अधिकार सुहास राजेशिर्के यांना दिलेले नाहीत मग हे निर्णय कसे घेणार ? आम्ही जे प्रश्‍न मांडले आहेत ते वैयक्तिक नसून सर्वसामान्य सातारकरांचेच आहेत. यापुढेही सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी आंदोलन करावे लागले तर ते करणारच. नगराध्यक्ष नसतानाही आठ दिवसात कामे होणार असतील तर आम्ही त्यांच्या भूमिकेचे स्वागतच करु. नगराध्यक्षांनी कोणालाही अधिकार दिला नाही म्हणजे यात टक्केवारी बुडेल अशी भीती त्यांना वाटते का ? स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु आहे. विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना त्यांच्याच आघाडीने बोलावले आहे. शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते सातार्‍यात येणार आहेत, त्याची तयारी सोडून नगराध्यक्ष परदेशवारीवर जातातच कशा? स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात सातारचा नंबर येणार कसा? सगळा दिखाऊपणाचा कारभार चालला आहे. सातारकर जनता सगळे उघड्या डोळ्याने बघत आहे. मांजर डोळे झाकून दूध पिते त्याला वाटते जग आपल्याला बघत नाही पण तसे नसते हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. नगराध्यक्षांच्या सहीशिवाय मुख्याधिकारी बिले काढतात, चेक काढले जातात. हा यांचा  पारदर्शक कारभार आहे का? प्रशासनाकडून नगराध्यक्षांना कठपुतलीसारखे वागवले जाते त्यावर सातारा विकास आघाडी एक शब्दही काढत नाही. सातारा विकास आघाडीच्या
कुठल्याच पदाधिकार्‍यावर विश्‍वास न दाखवता नगराध्यक्ष परदेशवारीला निघून जातात म्हणजेच यांच्या यांच्यातच ताळमेळ नाही आणि शहराचा विकास कसा साधणार ? जो काही कारभार चाललाय तो आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातयं असा आहे.  या कारभारावर आम्ही वर्षभर लक्ष ठेवून होतो. नवीन नगराध्यक्ष आहेत, नवीन पदाधिकारी आहेत त्यांना काम करण्यासाठी अवधी दिला पाहिजे म्हणून आम्ही गप्प होतो, पण वर्ष झाले तरी नगराध्यक्ष आणि प्रशासनाच्या कारभारात सुधारणा नाही. शेवटी जनहितासाठी लोकशाहीतील विरोधकांची भूमिका आम्हाला बजावावीच लागणार आहे.  त्यासाठी आम्ही आमच्या ठोस भूमिका बजावतो आहे. चांगले काम केले तर निश्‍चित स्वागत करु. पण जनतेची
कामे होणार नसतील, चुकीची कामे होणार असतील तर त्याला ठोस विरोध केला जाईल.
विरोधी पक्षनेते अशोक मोने म्हणाले, नगराध्यक्ष शहरात आहेत का रजेवर गेले आहेत हे कुणाला विचारणार? मुख्याधिकारी जागेवर नाहीत. पालिकेचे पदाधिकारी, सत्तारुढचे प्रतोदही पालिकेत नाहीत. माहिती विचारणार कोणाला ? पालिकेच्या अंदाजपत्रकाच्या बैठका सुरु आहेत. स्वच्छ सर्वेक्षण सुरु आहे. काही दिवसांत दिग्गज नेते सातार्‍यात येणार आहेत. त्याचे नियोजन करायचे सोडून नगराध्यक्ष पदभार न देताच परदेश दौर्‍यावर कशा काय जाऊ शकतात? सातारा नगरपालिकेचा कारभार वार्‍यावर सोडून नगराध्यक्ष गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतानाच्या शिष्टमंडळात नगरसेवक शेखर मोरे-पाटील, नगरसेविका लीना गोरे, मनीषा काळोखे, दीपलक्ष्मी नाईक, सोनाली नलावडे, राजू गोरे, विजय काळोखे, पोपट मोरे, राजू मोरे उपस्थित होते.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: