Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहशतवादी पलायन प्रकरणी सहा जणांना अटक
ऐक्य समूह
Friday, February 09, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: na2
5श्रीनगर, दि. 8 (वृत्तसंस्था) : श्रीनगर येथील श्री महाराजा हरिसिंग सरकारी रुग्णालयावर हल्ला करून एका दहशतवाद्याने ‘लष्कर-ए-तोयबा’चा कमांडर नावीद जट उर्फ हंझुल्ला याला पळवून नेल्या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या सहा जणांनी या घटनेत दहशतवाद्यांना मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, लष्कराच्या मोहिमांमध्ये ‘तोयबा’चे अनेक कमांडर ठार मारले गेल्याने या दहशतवादी संघटनेला जम्मू-काश्मीरमध्ये म्होरक्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ही संघटना हंझुल्ला याला काश्मीरमधील प्रमुख कमांडर म्हणून नेमण्याची शक्यता पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी व्यक्त केली आहे. हंझुल्लाच्या पलायनामुळे काश्मीर खोर्‍यात ‘तोयबा’च्या कारवाया वाढतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
‘तोयबा’चा दहशतवादी नावीद जट उर्फ हंझुल्ला याला कुलगाम जिल्ह्यात 2014 साली अटक करण्यात आली होती. नावीद हा पाकिस्तानमधील मुलतान येथील वेहारी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला तुरुंगातून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी एका दहशतवाद्याने हल्ला करून त्याला पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेले होते. या हल्ल्यात दोन पोलीस जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही
फुटेज ताब्यात घेतले. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी पुलवामा व शोपियाँ जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. या छाप्यांमध्ये सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या पलायन प्रकरणात त्यांचा हात असल्याचा संशय आहे. पलायनासाठी दहशतवाद्यांनी वापरलेली एक मोटरसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली
आहे. दरम्यान, ‘हिजबुल मुजाहिद्दीन’चा कमांडर रियाझ नायको याने बुधवारी रात्री एक ऑडिओ संदेश जारी करून नावीद व त्याला पळवून नेणारा दहशतवादी सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याचे सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: