Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

वैज्ञानिक खेळण्यांचे शिल्पकार
vasudeo kulkarni
Saturday, February 10, 2018 AT 11:26 AM (IST)
Tags: vi1
उत्तरप्रदेशातल्या बरेली जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यात जन्मलेल्या अरविंदकुमार गुप्ता यांनी, गावातल्याच प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. पुढे कानपूरच्या आय. आय. टी. मधून बी. ई. झाल्यावर,  शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित सोपे करून कसे शिकवता येईल, या ध्यासाने त्यांना पछाडले. देशातल्या बहुतांश प्राथमिक आणि माध्यमिक शाळातल्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय खूप अवघड वाटतात, याचा अनुभव त्यांनी प्राथमिक शाळेत शिकतानाच घेतला होता. विद्यार्थ्यांच्या भावविश्‍वाचा आणि सर्जनशीलतेचा विचार करून सोप्या खेळण्याद्वारे त्यांना हे विषय शिकवल्यास त्यांना ते अवघड तर वाटणार नाहीतच, पण  हे विषय मुले वैज्ञानिक खेळण्याद्वारे हसत खेळत शिकतील असा त्यांना विश्‍वास होता. अभियांत्रिकी महा-विद्यालयात प्राध्यापक असतानाच त्यांनी आपल्या घरातच वैज्ञानिक खेळण्यांचा  प्रयोग सुरु केला. रिकाम्या बाटल्या, कागद, सायकलच्या रबरी ट्युबा, लोहचुंबक, पुठ्ठे, रद्दी अशा टाकाऊ साहित्यातून त्यांनी काही वैज्ञानिक खेळणी तयार केली. जपानच्या  ओरिगामी (कागदापासून पक्षी, झाडे आणि विविध वस्तू तयार करणे) कलेचाही अभ्यास केला. त्यात प्राविण्य मिळवले. प्रारंभी शाळा-शाळात जाऊन या वैज्ञानिक खेळण्याद्वारे ते गणित आणि विज्ञान शिकवायला लागले. त्यांचा हा  अभिनव प्रयोग विद्यार्थ्यांना खूप आवडला. पुणे विद्यापीठाच्या आवारा-तल्या ‘आयुका’ जवळच पुणे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, या मुलांना  विज्ञान शिकवायसाठीच्या संस्थेची स्थापना करायसाठी पु. ल. आणि सुनिती देशपांडे यांनी आर्थिक सहाय्य केले.  2003 मध्ये हे अभिनव ‘मुक्तांगण’ केंद्र सुरु झाले. गुप्ता आणि त्यांच्या सहकार्‍यांनी  3हजाराच्या वर वैज्ञानिक खेळण्यांची निर्मिती गेल्या पंधरा वर्षात केली आहे. 3000 शाळतून या खेळण्याद्वारे विज्ञान आणि गणित शिकवले आहे. खेळण्याद्वारे विज्ञानाच्या प्रसार आणि शिक्षणासाठी गुप्ता यांनी 50 च्या वर पुस्तकेही लिहिली. शाळा शाळातून हा प्रयोग सहजपणे करता यावा, यासाठी वेबसाईट आणि यू ट्यूबद्वारे त्यांनी ही खेळणी तयार करण्याची कृती, विज्ञानविषयक 7 हजार पुस्तके आणि तीही इंग्रजीसह देशातल्या 22 भाषांतून उपलब्ध केली आहेत. 8500 डिव्हिडी  2200 लघु चित्रपट वेबसाईटवर उपलब्ध आहेत. गुप्ता आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गेल्या तीस वर्षात देशभरात 500 च्या वर कार्यशाळाही घेतल्या. विद्यार्थ्यी आणि शिक्षकांना वैज्ञानिक खेळणी तयार करायचे तंत्रही शिकवले. या सर्व कार्यशाळा पूर्णपणे मोफत होत्या. उपग्रह वाहिन्यांवरही त्यांनी विज्ञान आणि गणिताचे पाठ द्यायचा उपक्रमही केला होता. गेली 35 वर्षे अखंडपणे त्यांनी शालेय विद्यार्थ्यात विज्ञानाचा प्रसार खेळण्याद्वारे केला. दुर्गा शेट्टी या मुलीने टाकाऊ वस्तूपासून तयार केलेल्या वैज्ञानिक खेळण्याची चित्रफीत यू ट्यूबवर प्रसारित झाल्यावर तिला उच्च शिक्षणासाठी 517 धनादेश मिळाले. दुर्गमभागात सरकारी शाळेत शिकणार्‍या या मुलीची वैज्ञानिक झेप पाहून शिक्षणतज्ञही थक्क झाले. वैज्ञानिक खेळण्यांच्या या जादूगाराचा अलिकडेच महाराष्ट्र फौंडेशनने पुरस्कार देऊन सन्मान केला होता. आता केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ जाहीर करून त्यांच्या  विज्ञान प्रसाराच्या कार्याचा गौरव केला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: