Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
असूयेपोटी विरोधकांचे मुख्याधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप : सुहास राजेशिर्के
ऐक्य समूह
Saturday, February 10, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 9 : सातारा विकास आघाडीने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कास तलाव उंची वाढवणे, भुयारी गटार योजना, पोवई नाका ग्रेड सेपरेटर तयार करणे, प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन या मुख्य चार कामांचा शुभारंभ माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतला आहे. सातारा विकास आघाडीने चालवलेल्या लोककल्याणकारी विकास कामांच्या वाटचालीमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. नगर विकास आघाडीला त्याची ‘असूया’ वाटत आहे. त्या असूयेपोटी मुख्याधिकारी यांच्यावर तथाकथित भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत, असे निवेदन उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सातारा विकास आघाडीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना दिले. दरम्यान, नगरविकास आघाडीने केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार निवड समितीची बैठक शुक्रवार, दि. 16 रोजी दुपारी 4 वाजता बोला वली आहे. पॅचिंगची कामे 19 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. श्रीमंत अभयसिंहराजे भोसले उद्यानातील कामे करण्यासाठी विषय मंजूर केला आहे, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नगराध्यक्षा सौ. माधवी कदम आणि सातारा विकास आघाडीमध्ये समन्वय आहे. त्या  खाजगी दौर्‍यावर गेल्या आहेत. खाजगी दौर्‍यावर जाताना त्यांनी पूर्वकल्पना दिलेली आहे. सर्वसाधारण सभेचा अजेंडादेखील जारी करून त्या गेल्या आहेत. धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याचे काम दोन तीन दिवसात कोणतेही झालेले नाही. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्याकडे त्या पदभार सोपवत होत्या. तथापि तशी आवश्यकता नसल्याने त्यांचा चार्ज उपनगराध्यक्षांकडे दिलेला नाही.
पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे हे अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहेत. मुख्याधिकारी यांच्यावर केलेले आरोपांचे भांडवल  करून विरोधी नगरविकास आघाडीने कोणतेही राजकारण करू नये. मुख्याधिकारी हे समन्वय राखून कामकाज करत आहेत म्हणून सत्ताधारी सातारा विकास आघाडी ही त्यांच्या बाजूने आहे. विरोधकांना आरोप करण्यासाठी एका सामाजिक आरटीआय कार्यकर्त्याचा आधार घ्यावा लागत आहे यावरूनच त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या आडून कोण कटकारस्थान करत आहे, हे स्पष्ट झाले आहे. हे सामाजिक आरटीआय कार्यकर्ते समाजासाठी काय करतात ते लवकरच उघडकीस येणार आहे. गेल्या वर्षभरातील नियोजनात्मक कामांमुळे काही दिवसात मोठ्या कामांचा दिमाखात शुभारंभ होत आहे. खा. उदयनराजे हे सर्व सामान्य जनतेचे आहेत. सर्वसामान्यांच्या विकासासाठी ते कोठेही कमी पडणार नाहीत. त्यांनी सर्व नगरसेवकांना जनतेच्या हितासाठी कार्यरत राहून कामे करा, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे सातारकरांच्या हितासाठी झटणार्‍या सातारा विकास आघाडी विरोधात असूयेपोटी नगर विकास आघाडीकडून आरोप केले जात आहेत.  पोटशूळ उठल्यानेच विरोधक बोलत आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये तथ्य नाही. उलट जिल्हाधिकार्‍यांचा अमूल्य वेळ त्यांनी वाया घालवला आहे. निवेदन देताना आरोग्य समितीचे सभापती यशोधन नारकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम समितीचे सभापती मनोज शेंडे, नियोजन समितीच्या सभापती सौ. स्नेहा नलवडे, माजी सभापती वसंत लेवे, नगरसेवक किशोर शिंदे, ज्ञानेश्‍वर फरांदे उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: