Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

‘पिंक डे’ला ऐतिहासिक कामगिरीचे टीम इंडियाचे लक्ष्य
ऐक्य समूह
Saturday, February 10, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: sp1
5जोहान्सबर्ग, दि. 9 (वृत्तसंस्था) : दोन सामन्यांमधील कर्णधार विराट कोहलीची शतके आणि तिन्ही सामन्यांमध्ये कुलदीप यादव व युजवेंद्र चहल या फिरकी जोडगोळीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांभोवती विणलेले मायाजाल, यांच्या जोरावर टीम इंडियाने सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. आता उद्या (शनिवार) जोहान्सबर्गच्या वाँडरर्स
मैदानावर ‘पिंक डे’ला होणार्‍या चौथ्या सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकदिवसीय मालिका विजयाचा इतिहास रचण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये गलितगात्र झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला एबी डीव्हिलियर्सच्या पुनरागमनामुळे नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, भारताच्या फिरकी दुकलीसह वेगवान गोलंदाजांच्या अचूक मार्‍यापुढे डीव्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेला एकहाती तारू शकणार का, हा प्रश्‍न आहे.
दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट संपल्यानंतर 1991 साली त्यांच्या क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले. त्यानंतर 1992 मध्ये भारतीय संघाने सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तेव्हापासून आतापर्यंतच्या दौर्‍यातील एकदिवसीय मालिकांमध्ये भारताची झोळी रिकामीच राहिली आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्या भूमीत मुकाबला केला आहे. मात्र, एकाही संघाला मालिका जिंकण्यात यश आले नाही. अपयशाची ही मालिका खंडित करून ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला आहे.
दक्षिण आफ्रिकेत स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि या कर्करोगाला बळी पडलेल्या महिलांच्या उपचारांसाठी आर्थिक निधी उभारण्याच्या उद्देशाने दरवर्षी 10 फेब्रुवारीला ‘पिंक डे’ साजरा केला जातो. 2013 पासून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटमध्येही ‘पिंक डे’ला महत्त्व आले आहे. या दिवशी होणार्‍या सामन्यांला ‘पिंक डे’ सामना, असे संबोधले जाते. ‘पिंक डे’ला आतापर्यंत झालेला एकही एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेने गमावलेला नाही. ‘पिंक डे’लाच डीव्हिलियर्सने एकदिवसीय सामन्यातील सर्वांत वेगवान (31 चेंडूत) शतक झळकवले होते. भारताविरुद्ध पहिल्या तीन सामन्यांमध्ये सपाटून मार खाल्लेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात आता डीव्हिलियर्सचे पुनरागमन झाले असून तो संघाचे नशीब बदलण्यात यशस्वी होणार का, हा प्रश्‍न आहे. दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय मालिकेत सुरुवातीपासून दुखापतींनी छळले आहे. कर्णधार फाफ डू प्लेसी उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे तर तीन सामने खेळू न शकलेला डीव्हिलियर्स संघात परतला आहे, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. मात्र, भारताचे लेगस्पिनर युजवेंद्र चहल व कुलदीप यादव हे यजमानांसाठी कर्दनकाळ ठरले आहेत. या दोघांनी तीन सामन्यांमध्ये एकूण 21 बळी घेतले आहेत. त्यांना वेगवान गोलंदाजांचीही समर्थ साथ लाभत आहे.
उद्याच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा सामना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज कसा करणार, हा प्रश्‍न आहे. डीव्हिलियर्सच्या जोडीला अंतिम चमूत फरहान बेहरादिनला संघात स्थान मिळू शकते. त्यासाठी खाया झोंडोला वगळावे लागेल. अनुभवी
मॉर्नी मॉर्केलही पुनरागमन करण्याची
शक्यता आहे.
या मालिकेत भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे कर्दनकाळ ठरले असले तरी भारताची फलंदाजी विराट कोहली, अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांच्यावरच अवलंबून असल्याचे चित्र या मालिकेत पहायला मिळत आहे. सलामीवीर रोहित शर्माला सूर गवसलेला नसून मधल्या फळीतील फलंदाज अवसानघातकी खेळ करत आहेत. डीव्हिलियर्सकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. भारतीय फिरकीपटूंचे जाळे भेदून तो फलंदाजीत यशस्वी ठरला तर दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करताना मोठी मजल मारता येऊ शकते किंवा मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणेही शक्य आहे. या परिस्थितीत भारताच्या उर्वरित फलंदाजांनाही चांगली कामगिरी करावी लागेल.
संघ पुढीलप्रमाणे : भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंग धोनी, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्‍वरकुमार, जसप्रीत बूमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव,
युजवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्क्रम (कर्णधार), हाशिम आमला, एबी डीव्हिलियर्स, क्विंटन डी कॉक, जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर, खाया झोंडो, हेन्रिच क्लासन, इम्रान ताहीर, मॉर्नी मॉर्केल, ख्रिस मॉरिस, लुंगीसानी एनगिडी, अँडिल फेलुक्वायो, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: