Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

कर्तव्यनिष्ठ सेवेचे बक्षिस
vasudeo kulkarni
Saturday, February 10, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: lolak1
 पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांची अवघ्या अकरा महिन्यातच नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी तडकाफडकी बदली केल्याने, कार्यक्षम कारभाराबद्दल सरकारने त्यांना ही हे बक्षीस दिल्याच्या सर्वसामान्य पुणे करांच्या प्रतिक्रिया आहेत. 2003 मधल्या तुकडीचे मुंडे हे आयएस अधिकारी. कायदा आणि नियमानुसारच कारभार करायच्या खाक्याने यापूर्वीही सोलापूर जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाची त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली. आमदार/खासदारांचा प्रसंगी मंत्र्यांचाही दबाव त्यांनी कधीच मानला नाही. लोकहित-स्वच्छ कार्यक्षम कारभारालाच त्यांनी अग्रक्रम दिला. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी शहरातली  बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे धडाकेबाज मोहिमेत पाडून टाकली. त्यात काही माजी मंत्र्यांच्या हितसंबंधियांच्या बांधकामांचाही समावेश होता. या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या बदलीचा ठराव एकमताने मंजूर झाल्यावरही,  मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी त्यांना अभय देत त्याच पदावर  ठेवले होते. पण नंतर फडणवीीस यांनी त्यांची बदली प्रचंड तोटा, कर्मचार्‍यांची बेशिस्त आणि गैर व्यवस्थापनाने गाजलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी केली. त्यांनी या पदाची सूत्रे स्विकारली तेव्हा, महापालिकेची बस वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होती. गाड्या सतत बंद पडणे, भाड्याने घेतलेल्या खाजगी बस मालकांची मनमानी या सार्‍या पार्श्‍वभूमीवर मुंडे यांनी परिवहन महामंडळाच्या कारभाराचा ठप्प झालेला, तोट्याच्या गाळात रुतलेला गाडा    बाहेर काढला. स्वत: शहरात फिरून प्रवाशांच्या समस्या आणि अडचणी समजून घेत, त्यानुसार बसच्या वेळापत्रकात बदल घडवले. महापालिका कारभार्‍यांच्या आशीर्वादाने दांड्या मारणरे, कामचुकार, कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित केेले. प्रवाशी असतानाही बस थांब्यावर थांबत नाही, अशा प्रवाशांच्या असलेल्या सार्वत्रिक तक्रारींचे निराकरण केले. वाटेतच नादुरुस्त बसगाड्या बंद पडायचे प्रमाणही कमी केले. बस गाड्यांची संख्या वाढवली. प्रवाशांसाठी विविध उपक्रम आणि सुधारणा अंमलात आणल्या. या तोट्यातल्या  कंपनीचा प्रचंड तोटा ही कमी केला. बस संख्या वाढवतानाच, नव्या कर्मचार्‍यांची नियुक्त न करता वाहतूक  व्यवस्थेचे संचलन कार्यक्षमपणे केले. गेल्यावर्षी पर्यंत 347 कोटी रुपयांच्या तोट्यात असलेल्या महामंडळाचा हा तोटा कमी करून त्यांनी वर्षअखेर 100 कोटी रुपयापर्यंत खाली आणला. महामंडळाच्या कर्मचार्‍यासाठी नवी नियमावली कडकपणे अंमलात आणाली. महामंडळ आणि प्रवाशांच्या हिताला अग्रक्रम देणार्‍या मुंडे यांच्या या शिस्तबध्द कारभाराने महापालिकेचे पदाधिकारी आणि  कर्मचार्‍यात त्यांच्या  कार्यपध्दतीबद्दल अपेक्षेप्रमाणेच नाराजी निर्माण झाली. कर्मचार्‍यांना त्यांची शिस्त नकोशी झाली. परिवहन महामंडळ ही स्वतत्र कंपनी असल्याने महापालिकेतल्या सत्ताधारी पदाधिकार्‍यांनाही कायद्यद्वारे त्यांना घेरणे अशक्य झाले. पदाधिकार्‍यांना त्यांचा हा शिस्तध्द कारभाराचा तडाखा नकोसा झाला तरी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मनुष्यबळाचे कुशल व्यवस्थापन आणि बस मार्गाचे सूसुत्रीकरण, फेर्‍यांचे योग्य नियोजन, वेळापत्रकानुसार धावणार्‍या बस गाड्या यामुळे पुणेकरात मात्र त्यांचा करभार लोकप्रिय झाला होता.  पुण्याची सिटीबसच्या कारभारात    अमुलाग्र बदल झाल्याचे जाणवत होते. पण, महापालिकेच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या  काही पदाधिकार्‍यांनी  फडणवीस यांच्याकडेच  मुंडे यांच्या बदलीची मागणी केल्याने, या कार्यक्षम अधिकार्‍यांनी केलेल्या शिस्तबध्द  कारभाराची शिक्षा म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.  प्रामाणिक आणि लोकहिताचा कारभार करणार्‍या अधिकार्‍यांच्या अशा  तडकाफडकी बदल्या होत असतीलतर,     पारदर्शी कारभार होणार तरी कसा? 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: