Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
न्या. लोया मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची खासदारांची मागणी
ऐक्य समूह
Saturday, February 10, 2018 AT 11:20 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : न्यायाधीश लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वातील एसआयटीद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. ही मागणी करताना विरोधी पक्षाच्या एकूण 120 खासदारांनी आपल्या सह्यांची एक याचिकाच राष्ट्रपतींकडे पाठवली आहे.
विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणीही सुरू आहे. न्यायाधीश लोया यांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे जाणणे गरजेचे आहे. या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी व्हायला हवी असे विरोधी पक्षाच्या खासदारांचे म्हणणे आहे. मात्र, या एसआयटीवर सर्वोच्च न्यायालयाची  देखरेख असावी, अशी आमची मागणी असल्याचे तृणमूल काँग्रेसचे नेता डेरेक ओ ब्रायन यांनी म्हटले आहेत. न्यायाधीश लोयांच्या मृत्यूबाबत अनेक पद्धतीने चर्चा सुरू असल्याचे विरोधी पक्षाच्या खासदारांचे म्हणणे आहे. अशात केवळ एसआयटीद्वारे हा गुंता सोडवला जाऊ शकतो, असेही त्यांना वाटते. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूशी संबंधित याचिकेवर सुनावणी झाली. आता या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी 12 फेब्रुवारीला होणार आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला न्या. लोया यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्या. लोया हे बहुचर्चित सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी घेत होते. 1 डिसेंबर 2014 ला आपल्या सहकार्‍याच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी नागपूरला गेलेल्या न्या. लोयांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. लोया यांच्या बहिणीने त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: