Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मराठवाडा, विदर्भाला गारपिटीचा तडाखा; महिलेसह दोघांचा मृत्यू
ऐक्य समूह
Monday, February 12, 2018 AT 10:51 AM (IST)
Tags: mn1
कांदा, गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान
5नागपूर, दि. 11 (वृत्तसंस्था) : मराठवाडा आणि विदर्भाला जोरदार गारपिटीचा तडाखा बसला आहे. अनेक भागात गारपीट झाली असून शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जालन्यातील वंजार उमरद गावातील 70 वर्षीय नामदेव शिंदे यांचा गारा अंगावर पडून मृत्यू झाला. तर वाशिममध्ये महागाव येथे यमुना हुंबाड या महिलेचा दुर्दैवी अंत झाला. आणखी एक महिला जखमी आहे. जालना शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात आज सकाळी आठ वाजता वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ पडलेल्या टपोर्‍या गारांमुळे रस्त्यावर, शेतात गारांचा पांढरा खच साचला होता. गारांमुळे जालना तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा पिकांसह जाफराबाद तालुक्यात शेडनेट हाऊसचे नुकसान झाले आहे. अर्ध्या तासानंतर आकाश पांढरेशुभ्र होऊन ऊन पडले. वातावरणामध्ये सध्या कमालीचा गारवा आहे. तर अमरावतीतील अंजनगाव सुर्जी येथे रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर गारांसह जोरदार पाऊस पडला.
साधारण संत्र्याच्या आकाराएवढी मोठी गार येथे पाहावयास मिळाली. जवळपास दहा मिनिटे हा गारांचा जोरदार वर्षाव येथे सुरू होता. तालुक्यातील विहिगाव, चिंचोली, सातेगाव, मुर्खादेवी, कापूसतळणी, गावंडगाव, टाकरखेडासह अन्य गावांमध्येही हा गारांचा वर्षाव झाला. यामुळे संत्रा, हरभरा, कापूस व गव्हाच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातही गेल्या दोन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. वाशिमलाही आज गारपिटीचा फटका बसला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकर्‍यांवर जणू आभाळच कोसळले.
वाकद परिसरात वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने उरलासुरला रब्बी हंगामही हातचा जाण्याची वेळ शेतकर्‍यांवर येऊन ठेपली आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढल्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मालेगाव व वाशिम तालुक्यात वादळी पाऊस झाला. पाऊस आणि गारपीट झालेल्या भागातील पिके जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम, सेलू, बोरी येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला तर जिंतूर तालुक्यातील वझुर येथे वादळी वार्‍यांसह गारपीट झाली.
पंचनामे तातडीने करावेत : ना. पांडुरंग फुंडकर
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, धुळे या भागात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने करावेत. जिल्हा प्रशासनाने उद्या विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी दिले.
राज्यातील ज्या भागात आज अवकाळी पाऊस व गारपीट झाली, त्याचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला. त्यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत चर्चा केली.
ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकांचे तसेच काढणी पश्‍चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे. त्याबाबत माहिती त्वरित विमा कंपन्यांना कळवावी. यासाठी जिल्हाधिकारी, कृषी अधिकार्‍यांनी उद्या संबंधित विमा कंपन्यांची बैठक घ्यावी व त्यांना झालेल्या नुकसानीबाबत गावनिहाय शेतकर्‍यांची माहिती द्यावी. त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवसातील माहितीही इमेलद्वारे देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून संबंधित विमा कंपनीला बाधित शेतकर्‍यांची आकडेवारी उपलब्ध करून देता येईल.
स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनी देखील पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करावा, अशा सूचना कृषिमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: