Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

डिजिटल दहशतवादाचे आव्हान
vasudeo kulkarni
Monday, February 12, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: vi1
सध्या भारत-पाक सीमेवर होत असलेल्या चकमकी, त्यामुळे वाढत्या शहिदांची संख्या आणि दहशतवादी हल्ल्यांची चिंता जरी देशाला भेडसावत असली तरीही देशापुढचे फार मोठे आव्हान आहे ते डिजिटल दहशतवादाचे. फार मोठे आव्हान आहे ते सायबर क्राईमचे. जेवढी भयानकता एका अणुबॉम्बमध्ये आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने दाहकता ही डिजिटल शस्त्रांची आहे. सोशल मीडियाचा वापर करून सोडलेली ही डिजिटल अस्त्रे नियंत्रित करणे हे आपल्या देशापुढचे फार मोठे आव्हान आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. लॅपटॉप आहे. समोर पीसी आहे. वायफाय आहे. इंटरनेट आहे. हे सगळं कशासाठी आहे, तर जगाला जवळ करण्यासाठी हे सगळं विकसित झालेले आहे.
आपल्याकडे जसा या साधनांचा दुरुपयोग होताना दिसत आहे तसाच उपयोग किंबहुना दुरुपयोग शत्रुराष्ट्रांकडून आणि देशविघातक संघटनांकडून होताना दिसत आहे. दहशतवाद्यांच्या हातात गेलेले हे तंत्रज्ञानाचे हत्यार म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्याचा प्रकार झाल्याचे दिसत आहे. याचा अर्थ या तंत्रज्ञानाला किंवा सोयी-सुविधांना विरोध आहे, असे नाही तर त्याचा
होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.
चारच दिवसांपूर्वी देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची ट्विटर अकौंट हॅक केली होती. यामध्ये अभिनेते अनुपम खेर, भाजपचे नेते राम माधव अशा अनेक दिग्गजांचे अकौंट हॅक केले होते. यातून बरीचशी गोपनीय माहिती बाहेर जाऊ शकते. अनेकजण महत्त्वाच्या चर्चा मेसेंजरवरून करतात. ते सगळे ट्विटर, फेसबुक, जी-मेल अशा विविध माध्यमांना लिंक केलेले असते. त्यामुळे यातून होणारी चर्चा, गोपनीय माहिती, धोरणे ही परकीय शक्तीच्या हातात लागली
तर फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
आपण सीमेवरच्या झटा-पटींकडे लक्ष केंद्रित करत असताना या दृष्टशक्ती डिजिटल इंडियावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिजिटल इंडिया हे फार मोठे महासत्तेत जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ नये म्हणून परकीय शत्रू शक्ती त्यासाठी आक्रमक झालेल्या आहेत हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. या डिजिटल युद्धाचे अनेक प्रकार आहेत. समाजातील एकजूट संपुष्टात आणून माणसामाणसांमध्ये कलह निर्माण करण्याचे होत असलेले प्रयत्न हे त्याचेच एक स्वरूप आहे.
 सुरुवातीला सोशल मीडियातून ओळखी वाढवून मैत्री, प्रेमप्रकरणे, लव्ह जिहाद या छोट्या पण गंभीर प्रकारानंतर आपल्या गोटात महत्त्वाच्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरून गोपनियता काढून घेण्याची चाललेली षडयंत्रे थांबवण्याचे
फार मोठे आव्हान पेलावे
लागेल. कॉलसेंटर, जाहिरातीच्या माध्यमातून विविध कंपन्या, मल्टिनॅशनल कंपन्या यांच्याकडून कर्जाचे, विविध बक्षिसांचे आमिष दाखवून कागदपत्रे मिळवणे, माहिती मिळवणे, डेटा मिळवणे हे प्रकार सातत्याने होत असताना त्याचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी होत आहे हे तपासायची गरज आहे. एकूणच असलेले हे भयावह चित्र
म्हणजे डिजिटल दहशतवादाचे आव्हान आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: