Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

नव्या अवकाशयुगाचा प्रारंभ
ऐक्य समूह
Monday, February 12, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: lolak1
स्टीव्ह जॉब्ज या व्यक्तिमत्त्वाने गेल्या दशकात अविश्‍वसनीय वाटणार्‍या कल्पनांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणले व मानवी जीवन बदलवले. त्यामुळे स्टीव्हवर प्रेम करणारा आणि त्याच्याकडे आकर्षित झालेला मोठा वर्ग अ‍ॅपलचा ग्राहक झाला. त्यातून अ‍ॅपल जगातली सर्वात श्रीमंत कंपनी बनली. आयफोन, आयपॅड आणि मॅकबुकप्रोसारख्या आयुष्य बदलवून टाकणार्‍या प्रॉडक्टच्या अमाप यशानंतर स्टीव्ह जॉब्ज यांचे 2011 मध्ये निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतर अ‍ॅपलने नवे संशोधन बाजारात उतरवणे जणू बंदच करून टाकले.
स्टीव्ह जॉब्जच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील विज्ञानपंथीय लोकांना नव्या सुपर हिरोची नितांत गरज होती. ही गरज टेस्ला मोटर्स या कंपनीचे प्रवर्तक इलॉन मस्क पूर्ण करू शकतील असा विश्‍वास अलिकडे काहींना वाटू लागला आहे. स्टीव्ह जॉब्ज यांच्याकडे असलेले वाक्चातुर्य, स्वाभिमान, शोमनशिप यापैकी काहीही इलॉन मस्क यांच्याकडे नाही. ते कित्येकदा पत्रकारांना साध्याशा कॅफेमध्ये सँडवीच खात मुलाखत देतात आणि तशी मुलाखत देत असताना आपल्या ओठांना लागलेले मायोनिज पुसायचेही त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यांच्या टेस्ला मोटर्सतर्फे पहिली पूर्णतः विजेवर चालणारी ऑटोमेटेड कार बाजारात येऊन आज जवळजवळ दहा वर्षे झाली आहेत. या दहा वर्षांत अवघ्या काही हजार कार बाजारात आणण्यात टेस्लाला यश आले आहे. तरीही टेस्लाची शेअर बाजारातील पत अवाढव्य आहे.
प्रवासाचे समीकरणच बदलवून टाकणार्‍या इलॉन मस्क यांचे लक्ष आता अवकाशाकडे लागले आहे. अंतराळात केल्या जाणार्‍या प्रवासाची मूलभूत व्याख्या बदलवून टाकण्यासाठी मस्क यांचीच दुसरी ‘स्पेस एक्स’ ही कंपनी सरसावली आहे. अंतराळ प्रवासात आजपर्यंत ज्या रॉकेटचा वापर केला जात असे ती रॉकेट्स पृथ्वीच्या बाह्यकक्षेत गेल्यानंतर मूळ यानापासून वेगळी होऊन त्यांचा अवकाशातच स्फोट होत असे. पण मस्क यांच्या कंपनीचे रॉकेट हे यानापासून वेगळे झाल्यानंतर अवकाशात भरकटून किंवा जळून न जाता ते पृथ्वीवरून जेथून सोडण्यात येते त्या तळावर किंवा समुद्रात बांधलेल्या तळावर व्यवस्थित येते.
गेल्या मंगळवारी अशाच एका प्रयोगात इलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ने ‘फाल्कन हेवी’ या नव्या अंतराळ प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी घेतली. एकाच वेळी सहा लाख किलोहूनही अधिक भार वाहून नेण्याची क्षमता या प्रक्षेपकामध्ये असून माणसाने आजपर्यंत बनवलेल्या सर्वात मोठ्या चार प्रक्षेपकांमध्ये त्याचा समावेश होतो. ‘फाल्कन हेवी’च्या चाचणीचा उद्देश हा मोठ्या वजनदार वस्तू अवकाशात घेऊन जाणे हा होता. ही वजनदार वस्तू कुठली असावी याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते. मस्क यांनी त्यांच्या कल्पनेतून साकार झालेली ‘टेस्ला रोडस्टर’ ही कार निवडली.
गेली पाच वर्षे चीन, दक्षिण कोरिया, अ‍ॅमेझॉनसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या चांद्रमोहिमेची तयारी करीत आहेत. मानवाने चंद्रावर शेवटचे पाऊल ठेवण्याच्या घटनेला लवकरच पन्नास वर्षे होणार आहेत. अवकाश संशोधनाच्या या तीव्र स्पर्धेची झेप फार तर माणसाला चंद्र वा मंगळावर पाठवू
शकते. इलॉन मस्क यांना चांद्रमोहिमेत
विशेष रस नाही. माणसाने चांद्रमोहीम
आखून तिथे काही काळासाठी जाण्याऐवजी आता वसाहती वसवायला सुरुवात
करावी, असे आवाहन त्यांनी जगाला
केले आहे.
माणसाने चांद्रमोहीम आखून तिथे काही काळासाठी जाण्याऐवजी आता वसाहती वसवायला सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी जगाला केले आहे. चंद्रावर स्वयंचलित रोबोट्सकडून घरे, इतर इमारती बांधण्यात याव्यात. त्यानंतर पुढच्या टप्प्यात चंद्रावर कायमची मानव वसाहत वसवून चंद्राच्या कमी गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत अंतराळ प्रक्षेपणासाठी चंद्राचा वापर करण्याचा इलॉन मस्क यांचा मनसुबा आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: