Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महिलांवर अत्याचारच होणार नाहीत यासाठी काम करा : पठानिया
ऐक्य समूह
Monday, February 12, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 11 : आपल्या देशात महिला व मुलींचे शोषण मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रातही फार चांगली स्थिती नाही. महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात काम करत असताना पीडितांच्या पुनर्वसनाबरोबरच महिला व मुलींवर अत्याचारच होणार नाही याकरता काम करण्याची नितांत गरज आहे, अशी अपेक्षा पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पठानिया यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या जनकल्याण समितीतर्फे महिला सबलीकरण व पर्यावरणीय क्षेत्रासाठीचा माधव सदाशिव गोळवलकर तथा श्रीगुरुजी पुरस्कारांचे वितरण  जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झाले. महिला सबलीकरण क्षेत्रासाठीचा पुरस्कार श्रीमती ज्योती पठानिया यांना तर पर्यावरण क्षेत्राचा पुरस्कार लडाख येथील अभियंते चेवांग नॉर्फेल यांना प्रदान करण्यात आला. संघाच्या जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, संघाचे सह सरकार्यवाह सुरेश सोनी, समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. म. भा. फणसळकर, जिल्हा संघचालक डॉ. सुभाष दर्भे, नाना जाधव, डॉ. अविनाश पोळ  उपस्थित होते.
ज्योती पठानिया पुढे म्हणाल्या, आज मुलींवर संस्कार करत असताना मुलांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. समाजातून दबावगट तयार झाले पाहिजेत. शोषणासारखी घटना घडल्यास हे गट पीडितेच्या मागे उभे राहिले पाहिजेत. महिला व मुलींना सन्मानाची वागणूक मिळाली तर आपला समाज सुदृढ होईल. देशातील महिला व मुलींचे शोषण थांबवण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. त्यांच्या पुनर्वसनाबरोबरच त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी पावले उचलली गेली पाहिजेत. मुलींबरोबरच मुलांवरही चांगले संस्कार झाले पाहिजेत. त्याकरता किशोर-किशोरी जाणीव जागृती शाळांशाळांतून करावी लागेल.
नॉर्फेल यांनी लडाखमध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेतला. लडाखमधील प्रत्येक गावात काही ना काही काम केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मी अभियंता असलो तरी शेती डोळ्यासमोर ठेवून सर्व काम केले आहे.
सुरेश सोनी म्हणाले, दुसर्‍याचे दु:ख बघून संवेदना निर्माण झाली पाहिजे. त्यातूनच काम उभे राहते. समाजाला राष्ट्रीय विचारांची आणि संस्काराची गरज आहे. पुरस्कार दिल्याने संस्था मोठी होते. पुरस्कार देणार्‍यांची मनोगते ऐकून प्रेरणा मिळते. आजच्या कार्यक्रमातून अनेकांना प्ररेणा मिळाली असेल आणि त्याचा समाजाला उपयोग होईल.
सोनी यांच्या हस्ते श्रीमती पठानिया यांना तर  साताळकर यांच्या हस्ते नॉर्फेल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, श्रीफळ व प्रत्येकी एक लाख रुपये असे या पुरस्कारांचे स्वरुप होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले काही कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या शुभेच्छा संदेशाचे डॉ. दर्भे यांनी वाचन केले. प्रारंभी डॉ. रवींद्र साताळकर यांनी जनकल्याण समितीच्या कार्याचा आढावा घेतला. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. फणसळकर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: